बारामती : वीजबिल (Light Bill) जास्त का आलं म्हणून जाब विचारण्यासाठी आलेल्या एका विकृत मानसिकतेच्या तरुणाने एका 34 वर्षीय महिला वीज कर्मचाऱ्यावर (Mahavitaran Employee) कोयत्याने वार करुन संपवल्याची घटना घडली आहे. बारामतीतील मोरगाव येथे बुधवारी सकाळी 11.15 वाजेच्या सुमारास ही घटना घडली आहे. मन पिळवटून टाकणाऱ्या या घटनेत एका महिला कर्मचाऱ्याचा हकनाक बळी गेला आहे. 570 रुपयाच्या बिलासाठी आईची हकनाक हत्या झाल्याने एक वर्षाचं बाळ पोरकं झालं आहे.


एक वर्षाचं बाळ पोरकं, वीजबिलासाठी आईला संपवलं


मुळच्या लातूर शहरातील रहिवाशी असलेल्या सौ. रिंकू गोविंदराव बनसोडे ह्या दहा वर्षापूर्वी 2013 मध्ये महावितरणच्या सेवेत दाखल झाल्या होत्या. गेल्या 10 वर्षापासून त्या मोरगाव येथेच कार्यरत होत्या. नोकरीनंतर रिंकू बनसोडे यांचा विवाह झाला. त्यांना एक वर्षाचा मुलगा आहे. दहा दिवसांची सुटी संपल्यानंतर त्या मोरगाव कार्यालयात कामावर रुजू झाल्या.


नेमकं काय घडलं? वाचा इनसाईड स्टोरी


बुधवारी 24 एप्रिल रोजी सकाळी 11.15 च्या सुमारास रिंकू बनसोडे या मोरेगाव येथील कार्यालयात एकट्याच होत्या. यादरम्यान जणू काळ बनून हल्ला करण्यासाठी संपूर्ण तयारीनिशी आलेल्या अभिजीत पोटे या व्यक्तीने रिंकू यांना वीजबील जास्त आल्याचा जाब विचारला. या विकृत मानसिकतेच्या व्यक्तीने रिंकू यांच्या हातापायावर तोंडावर एकामागोमाग एक असे जवळपास 16 वार केले. काही कळायच्या आतच रिंकू रक्ताच्या थारोळ्यात पडल्या. रिंकू यांना मोरगाव येथे प्रथमोपचार केल्यावर त्यांना तातडीने पुण्यातील सह्याद्री रुग्णालयामध्ये उपचारासाठी दाखल केलं. पण दुर्दैवाने उपचारादरम्यान त्यांचे दुपारी 3 वाजेच्या सुमारास मृत्यू झाला. रिंकू बनसोडे यांच्या मृत्यूने महावितरणमधील कर्मचाऱ्यांवर शोककळा पसरली आहे. या घटनेचा कर्मचाऱ्यांसह सर्वच स्तरातून निषेध केला जात आहे. 


570 रुपयांच्या बिलासाठी हल्ला


हल्ला केलेल्या आरोपीचं वीजबिल रत्नाबाई सोपान पोटे या नावाने आहे. त्या वीजबिलाचा ग्राहक क्रमांक 186640053549 असा असून, चालू एप्रिल 2024 या महिन्याचे 63 युनीट वीजवापराचे वीजबिल 570 रुपये इतके आहे. मागील 12 महिन्याचा वापर तपासला असता तो 40 ते 70 युनिटमध्ये आहे. थकबाकी नाही, उन्हाचा तडाखा वाढल्यामुळे चालू महिन्यात वापर ३० युनीटने वाढला व त्याचे बील ५७० आले होते. हे बील वापरानुसार व नवीन दरानुसार योग्यच आहे. तसेच सदर ग्राहकाची वीजबिलाबाबत कोणतीही लेखी अथवा ऑनलाईन तक्रार नोंदवलेली नाही.


महत्त्वाच्या इतर बातम्या :


बारामतीतील धक्कादायक घटना! लाईट बिल जास्त आल्याने महावितरण कर्मचाऱ्याच्या डोक्यात कोयत्याने वार, महिलेचा मृत्यू