Maharashtra Pune Crime News : अंमली पदार्थांची विक्री करणाऱ्यांवर पुणे पोलिसांची (Pune Police) मागील काही दिवसांपासून करडी नजर आहे. त्यातच पुणे पोलिसांनी अंमली पदार्थांविरोधी मोठी कारवाई केली आहे. पुणे गुन्हे शाखेनं दोन आंतरराज्य अंमली पदार्थ विकणाऱ्यांकडून 2.21 कोटी रुपये किंमतीचे 1 किलो 108 ग्रॅम मेफेड्रोन (MD) जप्त केले आहेत. या प्रकरणी तिघांना अटकही केली आहे. यातील आरोपींमध्ये अल्पवयीन मुलांचादेखील समावेश आहे. 


मध्य प्रदेशातील रतलाम जिल्ह्यातील पिंपळखेडी येथील 35 वर्षीय आझाद शेरजमान खान, 16 वर्षांचा अल्पवयीन मुलगा आणि त्याच जिल्ह्यातील 35 वर्षीय नागेश्वर रामेश्वर प्रजापती अशी आरोपींची नावे आहेत. आरोपींना काल रात्री 2 कोटी 21 लाख 60 हजार रुपये किमतीच्या एक किलो 108 ग्रॅम एमडी ड्रग्जसह पकडण्यात आले आहे. रतलाम ते खराडी बस स्टॉप या ट्रॅव्हल बसमध्ये प्रवास करत होते. 


पोलीस शिपाई मनोजकुमार साळुंखे आणि मारुती पारधी यांना मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे अंमली पदार्थ विरोधी पथकाने खराडी चौक ते रक्षक नगर, स्नेहदीप सोसायटीजवळ सापळा रचून आरोपीला दारूसह पकडलं आहे. अंमलीपदार्थांसोबतच पोलिसांनी चार मोबाईल फोन, रोख रक्कम असा एक लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. एक लाल रंगाची सॅक बॅग जप्त केली आहे. चंदननगर पोलीस ठाण्यात आरोपींविरुद्ध  गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 


पुणे शहर पोलीस आयुक्त रतेश कुमार आणि पोलीस सहआयुक्त संदीप कर्णिक यांनी गुन्हे शाखेला शहरातील अंमली पदार्थांच्या तस्करीला आळा घालण्यासाठी विशेष मोहीम राबविण्याच्या सूचना दिल्या होत्या. त्यानुसार ही मोठी कारवाई करण्यात आली आहे. 


मागील काही दिवसांपासून पुणे पोलिसांची अमली पदार्थ विकणाऱ्या टोळीवर करडी नजर आहे. यापूर्वी त्यांनी अशीच कारवाई करत पुणे रेल्वे स्टेशन परिसरातून म्याव म्याव ड्रग्ज म्हणजेच, एमडी जप्त करण्यात आलं होतं. दहशतवादविरोधी पथकानं ही कारवाई करण्यात आली होती. जप्त केलेल्या ड्रग्जची किंमत सुमारे 12 लाख रुपये एवढी होती. पोलिसांनी या कारवाईत अंमली पदार्थ तस्कराला अटक करण्यात आली. महंमद फारुख महंमद उमर टाक असं अटक केलेल्या तस्कराचं नाव असून तो मूळचा राजस्थानचा होता. पुणे रेल्वे स्टेशनच्या परिसरातील मालधक्का चौकात एक इसम येणार असल्याची माहिती पथकाला मिळाली होती. त्यानुसार दहशतवादविरोधी पथकाच्या पुणे युनिटनं सापळा रचला. पाठीला सॅक लावलेला एक तरुण फुटपाथवर संशयास्पद रेंगाळताना दिसला. साध्या वेशातील पोलिसांनी महंमद टाक याला ताब्यात घेतलं होतं.