Twitter : मागील काही काळात ट्विटरविषयी(Twitter) जोरदार चर्चा रंगल्या आहेत. ट्विटर सतत त्यांच्या पॉलिसीमध्ये (Policy) काही ना काही बदल करत असल्याचं पाहायला मिळत आहे. ट्विटर आता पुढील महिन्यापासून प्रकाशकांना एका क्लिकवर प्रति लेख युजर्सकडून शुल्क आकरण्याची परवानगी देईल, अशा माहिती ट्विटरचे सीईओ एलॉन मस्क यांनी दिली आहे. 'माध्यम संस्था आणि लोकांसाठी हा विजय आहे' अशा आशयाचं ट्वीट एलॉन मस्क यांनी केले आहे. "ज्या युजर्सकडे ट्विटरचे सब्सक्रिप्शन नसेल त्यांना ट्विटरवर लेख वाचण्यासाठी जास्त किंमत मोजावी लागेल," असे देखील मस्क यांनी सांगितले आहे. तसेच पुढच्या महिन्यापासून ही सेवा प्रकाशकांसाठी सुरु करेल असे देखील मस्क यांनी त्यांच्या ट्वीटमध्ये म्हटले आहे. 






 


तसेच कॉन्टेट क्रिएटर्स आता त्यांच्या मोठ्या व्हिडीओसाठी आणि लेखासाठी पैसे आकारु शकतात असे देखील एलॉन मस्क यांनी ट्वीट करत सांगितले आहे. 






ट्विटरमध्ये आतापर्यंत झालेले बदल


ऑक्टोबर महिन्यात ट्विटरचा ताबा घेतल्यानंतर एलॉन मस्क यांनी ट्विटरमध्ये अनेक बदल केले. ट्विटरच्या अनेक धोरणांत मस्क यांनी बदल केले आहेत. 


एप्रिल महिन्याच्या सुरुवातीला ट्विटरच्या एका पॉलिसीमध्ये सांगितले होते की, ट्वटरच्या नियमांचे उल्लंघन करणाऱ्या ट्वीट्सना ट्विटरवर प्रतिबंधित करण्यात येईल. हा नियम हिंसक तसेच नियमांचे उल्लंघन करणाऱ्या ट्वीटवर लागू केला जाईल असे देखील ट्विटरकडून सांगण्यात आले होते. 


तसेच ट्विटरने नामांकित राजकीय नेते, अभिनेते, खेळाडू यांच्या ट्विटर अकाऊंटवरुन ब्लू टिक काढले होते. ब्लू टिकसाठी सुद्धा ट्विटरने शुल्क आकारण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे ज्या लोकांनी ब्लू टिकसाठी पैसे दिले त्यांनाच ट्विटरचे ब्लू टिक मिळाले. पण त्यानंतर एक मिलियनपेक्षा अधिक फॉलोअर्स असणाऱ्या लोकांसाठी ब्लू टिक फ्री केले. 


सीईओ म्हणून पदभार स्वीकारल्यापासून एलॉन मस्क यांनी कसलीच हयगय न ठेवता ट्विटरच्या नियमांत बदल केले आहेत. ट्विटरला फायद्यात आणण्याचा निश्चय केल्याचं देखील एलॉन मस्क यांनी सांगितले आहे. त्यामुळे आता ट्विटरमध्ये आणखी काय बदल होतील हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. 


महत्त्वाच्या इतर बातम्या 


Mann Ki Baat 100th Episode : 'मन की बात'चा शंभरावा भाग ऐतिहासिक बनवण्यासाठी जय्यत तयारी, देशातील राजभवनांमध्ये थेट प्रक्षेपण, जाणून घ्या सर्वकाही