Aurangabad Crime News: औरंगाबाद जिल्ह्यात (Aurangabad District) पुन्हा एक खुनाची (Murder) घटना समोर आली असून, मित्रानेच आपल्या दुसऱ्या मित्राचा जीव घेतल्याचे पोलीस तपासात समोर आले आहे. आपल्या पत्नीशी मित्राचे अनैतिक संबंध असल्याच्या संशयातून ही हत्या करण्यात आल्याचे देखील समोर आले आहे. या प्रकरणी पोलिसांनी आरोपीस अटक केली आहे. किरण नारायण सुरडकर (वय 28 वर्षे रा. पानवडोद) असे मृत तरुणाचे नाव आहे, तर राजू प्रल्हाद लाड (रा. पानवडोद) असे आरोपीचे नाव आहे.


पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, किरण सुरडकर 14 जानेवारीपासून बेपत्ता होता. त्याचे वडील आणि भाऊ यांनी बराच शोध घेतला, मात्र किरण काही सापडला नाही. किरण बेपत्ता होऊन पाच-सहा दिवस झाल्याने त्याचे भाऊ दीपक सुरडकर यांनी अजिंठा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यासाठी निघाले होते. या दरम्यान गोळेगाव-शिवना रस्त्यावरील पानवडोद खुर्द शिवारातील विहिरीमध्ये एक मृतदेह आढळल्याची माहिती त्यांना मिळाली. त्यामुळे त्यांनी घटनास्थळी जाऊन पाहिले असता, मृतदेह आपल्याच भावाचा असल्याचे त्यांना कळाले. त्यामुळे याप्रकरणी शुक्रवारी रात्री अजिंठा पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. 


पत्नीशी अनैतिक संबंधाचा संशय आल्याने केली हत्या 


किरण बेपत्ता झाला त्या दिवशी राजू प्रल्हाद लाड घरी आला होता. त्याने माझा भाऊ आणि गावातील दोन मित्रांना घरी नेले होते. घातपात करण्यासाठीच माझ्या भावाला घरी नेले आणि पत्नीशी अनैतिक संबधाच्या संशयावरून खून केला, अशी तक्रार किरणचा भाऊ दीपक सुरडकर यांनी दिली होती. त्यामुळे पोलिसांनी राजूला ताब्यात घेऊन अधिक चौकशी केली असता, त्याने खुनाची कबुली दिली आहे. किरणचे आपल्या पत्नीशी अनैतिक संबंधाचा संशय असल्यानेच आपण त्याची हत्या केली असल्याचं देखील त्याने पोलीस चौकशीत कबूल केले आहे. त्यामुळे पोलिसांनी त्याला अटक करत, खुनाचा गुन्हा दाखल केला आहे. 


आत्महत्या भासवण्यासाठी मृतदेह विहिरीत फेकला


किरणचे आपल्या पत्नीशी अनैतिक संबंधाचा संशय राजूला होता. त्यामुळे त्याने त्याला कायमचं संपवण्याचा निर्णय केला. त्यासाठी त्याने किरणच्या घरी जाऊन, त्याला आधी सोबत नेले.  त्यानंतर त्याला दारू पाजली आणि दारूच्या नशेत त्याचा खून केला. तसेच कुणालाही हत्या केल्याचा संशय येऊ नयेत आणि किरणने आत्महत्या केली असे वाटावे म्हणून, त्याचे प्रेत विहिरीत फेकून दिले. मात्र आरोपीने किरणचा खून कशाने केला? याचा तपास अजिंठा पोलीस करत आहेत. या प्रकरणी मयताचा भाऊ दीपक सुरडकर यांच्या तक्रारीवरून आरोपी राजू लाड याच्याविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


महत्वाच्या इतर बातम्या: 


Aurangabad News: शिवीगाळ करणारा मित्र डोक्यात बसला, म्हणून धारदार दगडाने मुंडके धडावेगळे करत त्याचा जीवच घेतला