Kalyan Crime News : कल्याणमध्ये धक्कादायक घटना घडली असून लिव्ह इन रिलेशनशिप (Live In Relationship) मध्ये राहत असलेल्या प्रियकराने प्रेयसीची चाकूने वार करत हत्या केली आहे. पोलिसांच्या माहितीनुसार. चारित्र्याच्या संशयावरून ही हत्या झाली असल्याचं सांगण्यात येतंय. दरम्यान, आरोपीला पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. या घटनेने संपूर्ण कल्याण हादरलं आहे.


 


लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये झाला घात


2022 साली राजधानी दिल्लीतील श्रद्धा वालकर हत्या प्रकरणानंतर लिव्ह इन रिलेशनशिप पुन्हा एकदा चर्चेत आली होती. श्रद्धाचा लिव्ह-इन पार्टनर आफताब पूनावाला याच्यावर श्रद्धाची हत्या, तिच्या शरीराचे तुकडे करून वेगवेगळ्या ठिकाणी फेकल्याचा आरोप आहे. मीडियात या घटनेची चर्चा झाल्यानंतर लिव्ह-इन रिलेशनशिपवर वाद सुरू झाला झाला होता. त्यानंतर कल्याणमध्ये घडलेल्या घटनेमुळे शहर हादरलं आहे. कल्याण पूर्व विजय नगर येथील आमराई परिसरात ही घटना घडली आहे. घटनेची माहिती मिळताच पोलीस त्वरित घटनास्थळी पोहचले. घटनेचा तपास करता पोलिसांकडून ही हत्या चारित्र्याच्या संशयावरून झाली असल्याचं सांगण्यात येत आहे. रसिका कोळंबेकर आणि विजय जाधव हे दोघं लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहत होते. विजयला रसिकाच्या चारित्र्यावर संशय होता, त्यामुळे या दोघांमध्ये वारंवार वाद होत होते. याच वादातून आज विजयने रसिकावर चाकूने हल्ला करत तिची राहत्या घरी हत्या केली असल्याचं पोलीस तपासात निष्पन्न झालं आहे.


 


कोळशेवाडी पोलिसांकडून गुन्हा दाखल
कोळशेवाडी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक महेंद्र देशमुख यांनी सांगितले की, कल्याणच्या आमराई परिसरात विजय जाधव व रसिका कोळंबेकर हे दोघं गेलं काही महिन्यांपासून लिव्ह इन रिलेशनशिप मध्ये राहत होते. काही महिन्यांपासून विजय हा रसिकाच्या चारित्र्यावर  संशय घेत होता. त्यामुळे या दोघांमध्ये वाद होत होते. आज सकाळच्या सुमारास विजय आणि रसिका मध्ये पुन्हा याच कारणावरून वाद झाला संतापलेल्या विजयने चाकूने रसिकावर हल्ला केला. या हल्ल्यात रसिका गंभीर जखमी झाली आणि तिचा जागीच मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत आरोपी विजय याला ताब्यात घेतले. रसिका हिचा मृतदेह शव विच्छेदनासाठी पाठवण्यात आला. याप्रकरणी कोळशेवाडी पोलिसांनी गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे .


 


लिव्ह-इन रिलेशनशिप म्हणजे काय?


लिव्ह-इन रिलेशनशिपची वेगळी कायदेशीर व्याख्या कुठेही लिहिलेली नाही. पण सोप्या भाषेत, दोन प्रौढ व्यक्तींचे स्वतःच्या इच्छेने लग्न न करता एकाच छताखाली एकत्र राहणे असे म्हणता येईल. बरेच जोडपे लिव्ह-इन रिलेशनशिपमध्ये राहतात, जेणेकरून ते ठरवू शकतील की दोघे लग्न करण्यासाठी एकमेकांसाठी योग्य आहेत की नाही. पारंपारिक विवाह व्यवस्थेत त्यांना रस नसल्यामुळे काहीजण या रिलेशनशिपमध्ये राहणे पसंत करतात. लाइव्ह लॉच्या अहवालानुसार, 1978 मध्ये बद्री प्रसाद विरुद्ध डायरेक्टर ऑफ कन्सोलिडेशनमध्ये, सर्वोच्च न्यायालयाने पहिल्यांदा लिव्ह-इन संबंधांना मान्यता दिली. विवाहयोग्य वयाच्या लोकांमधील लिव्ह-इन रिलेशनशिप कोणत्याही भारतीय कायद्याचे उल्लंघन करत नाही असे मानले गेले. सुप्रीम कोर्टाने म्हटले की, एखादे जोडपे दीर्घकाळ एकत्र राहत असेल तर ते नाते विवाह मानले जाईल. अशा प्रकारे कोर्टाने 50 वर्षांच्या लिव्ह-इन रिलेशनशिपला कायदेशीर मान्यता दिली होती.


 


इतर महत्त्वाच्या बातम्या


Ahmednagar News : आईच्या डोळ्यादेखत तिन्ही भावंडं बुडाली, एकाच चितेवर अंत्यसंस्कार, अहमदनगर जिल्ह्यातील दुर्दैवी घटना