अहमदनगर : अहमदनगर (Ahmednagar) जिल्ह्यातील जामखेड तालुक्यात हृदयद्रावक घटना घडली आहे. जामखेड (Jamkhed) तालुक्यातील खर्डा गावालगत असलेल्या अंतरवाली येथील एका पाझर तलावात कपडे धुण्यासाठी गेलेल्या तीन भावंडांचा बुडून दुर्दैवी मृत्यू (Drowned) झाला. या तिन्ही पोरांना वाचवण्यासाठी आईनेही स्वत: तलावात उडी मारली. मात्र रस्त्यावरून जाणाऱ्या वाटसरूंच्या धाडसाने मुलाच्या आईचे प्राण वाचवण्यात यश आले. गुरुवारी दुपारी एकच्या सुमारास ही घटना घडली. मात्र या दुर्दैवी घटनेमुळे खर्डा व परिसरावर शोककळा पसरली आहे.


अहमदनगर जिल्ह्यातील खर्डा येथून भूमकडे जाणाऱ्या शिर्डी-हैदराबाद राष्ट्रीय महामार्गालगत धाराशिव (Dharashiv) जिल्ह्यातील अंतरवली शिवारात असलेल्या एका पाझर तलावावर कपडे धुण्यासाठी गेलेल्या दोन मुले आणि एका मुलीचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली. एका वाटसरूच्या धाडसामुळे यातील मुलांच्या आईचा (Mother) जीव वाचवण्यात यश आले आहे. कृष्णा परमेश्वर सुरवसे, दीपक ज्ञानेश्वर सुरवसे, सानिया ज्ञानेश्वर सुरवसे अशी मृत बालकांची नावे आहेत.


सख्खे भाऊ-बहीण बुडाले


दीपक आणि सानिया हे दोघे सख्खे बहिण भाऊ तर कृष्ण हा त्यांचा चुलत भाऊ आहे. कृष्णा, दीपक हे इयत्ता दहावीत तर सानिया आठवीत शिकत होती. या कोवळ्या मुलांच्या दुर्दैवी मृत्यूमुळे कुटुंबासह गावावर शोककळा पसरली आहे. एकाच वेळी या तिन्ही मुलांवर अंत्यसंस्कार  करण्यात आले. यावेळी वाचलेल्या आईने मोठा हंबरडा फोडल्याचे पाहायला मिळालं.


कपडे धुण्यासाठी तलावावर


आपल्या आईसह ही तीनही मुलं कपडे धुण्यासाठी तलावाकडे आली होती. मात्र कपडे धुवत असताना सानिया पाय घसरून तलावातील पाण्यात पडली. सानिया पाण्यात बुडू लागल्याचे पाहतात दीपक, कृष्णा दोघेही तिला वाचवण्यासाठी पाण्यात उतरले. मात्र काही कळायचे आतच तिघेही बुडू लागले. हे पाहताच त्यांची आई रुपाली तिनेही पाण्यात उडी मारली, मात्र ती देखील पाण्यात बुडू लागली. त्याचवेळी आईने रस्त्याने जाणाऱ्या नागरिकांकडे वाचविण्यासाठी धावा केला. रस्त्यावरून जाणाऱ्या भूम तालुक्यातील गिरल गाव येथील सरपंच बिभीषण वाघमोडे, चांद पठाण आणि भाऊसाहेब दिगंबर वाळुंजकर यांनी तलावाकडे धाव घेत पाण्यात उड्या घेतल्या. त्यांनी बुडत असलेल्या महिलेला पाण्याबाहेर काढले. मात्र तीनही मुलांना वाचवण्यात अपयश आले.


आई वाचली, मुलं बुडाली


दरम्यान काल दुपारी एक वाजताच्या सुमारास ही घटना घडली. या घटनेत दहावीत शिक्षण घेत असलेला कृष्णा सुरवसे आणि दिपक सुरवसे तर आठवीत शिक्षण घेत असलेली सानिया सुरवसे हे भाऊ-बहिण या तिघांचा पाण्यामध्ये बुडून मृत्यू झाला. सुरूवातीला पाय घसरून पडल्याने मुलगी पाण्यात बुडू लागली. तीला वाचवण्यासाठी दोन्ही मुलं पाण्यात उतरली, मात्र पाण्याचा अंदाज न आल्याने तीही बुडू लागली. त्या तिघांना वाचवण्यासाठी यातील मुलांची आई रुपाली सुरवसे पाण्यात उतरली, मात्र तीही बुडत असताना तीने आरडाओरडा केल्याने रस्त्यावरून वाटसरुंच्या धाडसामुळे तिला वाचविण्यात यश आले, मात्र मुले वाचू शकली नाही. याप्रकरणी जामखेड पोलीस स्टेशनमध्ये आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.


इतर महत्वाची बातमी : 


Kolhapur News : खाणीत बुडणाऱ्या लेकराला वाचवण्यास आई धावली, पण त्याने मिठी मारली, दोघांचाही बुडून मृत्यू