हैदराबाद : महाराष्ट्रातील गुन्हेगार लपून बसण्यासाठी तेलंगणा राज्यातील हैदराबाद शहराची निवड करत असल्याचे समोर आले आहे. यशस्विनी महिला ब्रिगेडचे अध्यक्ष रेखा जरे यांच्या हत्याकांडमधील प्रमुख सूत्रधार असलेले आरोपी बाळ बोठे यांना नुकतीच हैदराबादमधून अटक करण्यात आली. हे प्रकरण ताजे असताना आता पुण्यातील दोन तरुणांना हैदराबादमधील रचकोंडा पोलिसांनी अटक केली आहे.


रचकोंडा पोलिसांनी सकाळच्या सुमारास खबऱ्यांच्या माहितीवरुन एल बी नगर भागात नंदकिशोर मनोज आणि रोहन राजीव चंदालिया यांना बेकायदा हत्यार बाळगल्याप्रकरणी अटक केली आहे. या दोघांकडून दोन देशी पिस्तुल, 4 जिवंत काडतुसे, मोबाईल फोन आणि 500 रुपये रोख रक्कम जप्त करण्यात आली आहे.




या आरोपींपैकी नंदकिशोर पुण्यातील चिखली येथील रहिवासी आहे. रोहन रावेत येथे राहणारा आहे. तर किरण शिवाजी खवळे (वय 24) हा निगडी येथील असून फरार आहे. नंदकिशोर आणि रोहन या दोघांची पार्श्वभूमी गुन्हेगारी क्षेत्रातील आहे. दोघेही एकमेकांचे चांगले मित्र आहेत. पुण्यात अनिकेत जाधव चालवत असलेल्या 'रावण साम्राज्य' या गँगमध्ये हे दोघेही सक्रीय आहेत. यातील नंदकिशोरची 10 वी तर रोहनचा आयटीआयचे शिक्षण झाले आहे. मात्र, दोघांनाही वाईट सवयी लागल्या होत्या. त्या दोघांनी अनिकेतची अलिशान जगणे पाहून गँग जॉईन केली. 2016 पासून दोघांच्या नावावर अनेक पोलीस ठाण्यात गुन्हे नोंद आहेत.




25 नोव्हेंबर 2020 मध्ये दोघांनाही निगडी पोलिसांनी अटक केली असता या दोघांना न्यायालयीन कोठडी मिळाली होती. त्यानंतर हे दोघेही फरार झाले आणि अटक टाळण्यासाठी त्यांनी हैदराबाद गाठले. पुण्यातील आणखी एक गँग जी विवेक नावाचा व्यक्ती चालवतो. हे दोघेही या गँगच्या रडावर आले होते. त्यामुळे या गँगपासूनही या दोघांच्या जीवाला धोका होता. यातूनच चार महिन्यापूर्वी यांच्यावर जीवघेणा हल्लाही करण्यात आला होता. यामुळे दोघांनीही आपल्या मध्यस्थी मित्राच्या मदतीने उत्तर प्रदेशमधऊन दोन देशी पिस्तूल प्रत्येकी 15 हजार रुपयांना खरेदी केले होते. 


हे दोघेही रंगा रेड्डी जिल्ह्यातील एल बी नगरमध्ये लपण्यासाठी घर शोधण्यासाठी आले होते. यावेळी संशय आल्याने पोलिसांनी या दोघांना ताब्यात घेतले असता त्यांच्याकडे दोन देशी पिस्तूल आढळले. ही अटक रचकोंडा पोलिस आयुक्त महेश भागवत यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली आहे. पुढील तपास सुरु आहे.