Maharashtra Crime : जेमतेम महिना झालाय आणि या एका महिन्यात महाराष्ट्राचा वासेपूर झालाय, काळाकुट्ट वासेपूर. जिथे मरणाचे भय आहे, जिथे बदल्याची आग आहे, त्या आगीत होरपळलेली माणसं आहेत, त्या आवाजाने भेदरलेली जनताही आहे. कधी कुठून गोळी येईल आणि रक्ताचे पाट वाहतील हे माहित नाही. आतापर्यंत असे सीन आपण फिल्ममध्येच पाहिले आहेत, पण आता हे वास्तवातही घडतंय. अगदी गँग्ज ऑफ वासेपूर (Gangs of Wasseypur) चित्रपटाप्रमाणे महाराष्ट्रात स्थिती असल्याचं चित्र आहे. 


थंड डोक्यानं, अगदी थंड डोक्यानं केलेले प्लॅन, कुणाला शंकाही येणार नाही असं प्लॅनिंग. महाराष्ट्रात उण्यापुऱ्या एका महिन्यात झालेल्या तीन घटनांमध्येही असंच प्लॅनिंग होतं. शरद मोहोळला (Sharad Mohol)  संपवण्याआधी विरोधी गटातल्या माणसांनी त्याचा विश्वास संपादित केला आणि त्याच्याच गँगमध्ये सामील होऊन एके दिवशी त्याचा काटा काढला. 


अभिषेक घोसाळकरांना (Abhishek Ghosalkar) संपवतानाही मॉरीसनं कंप्लिट फुलप्रूफ प्लॅनिंग केलं. ज्याने जेलमध्ये धाडलं, त्याच घोसळकरांशी मैत्री केली. त्यांच्या वाढदिवसाच्या शुभेच्छांचे फलक लावले. सार्वजनिक मंचावरुन आपल्यातलं वैर संपल्याचं जाहीर केलं आणि फेसबुक लाईव्हला बोलावलं. फेसबुक लाईव्ह संपत असतानाच पाच गोळ्या घातल्या आणि दीड वर्षापासून मनात पेटत असलेल्या 'बदला'च्या तगमगीला वाट मोकळी करून दिली. 


पराकोटीचा तिरस्कार, धगधगणारी बदल्याची भावना


पण मुद्दा असा आहे की इतका क्रोध, पराकोटीचा तिरस्कार, धगधगणारी बदल्याची भावना निर्माण होते कशी? आणि आर किंवा पार करण्याची मनाची तयारी होते कशी?


येता जाता सहज गोळ्या घालणे. कुठेही, कधीही, कसेही, मुडदे पाडणे हे फक्त सिनेमात किंवा यूपी-बिहारमध्ये होत असतं अशी धारणा होती. पण पडद्यावरचा हा रक्तपात आता आपल्या घरांशेजारी आला आहे. त्यातून बदल्याच्या आगीत धगधगणारी माणसं कदाचित इन्स्पायरही होतील. त्यामुळे बदल्याच्या या आगीचा महाराष्ट्रात वणवा होणार नाही इतकीच अपेक्षा आहे.


कायद्याचं राज्य नाही, पोलिसांचा धाक नाही


महाराष्ट्रात गेल्या काही दिवसांपासून घडणाऱ्या घटनांमुळे राज्यात कायद्याचं राज्य राहिलंय का नाही असा प्रश्न पडतोय. जिकडे तिकडे नुसती गुन्हेगारी फोफावतेय. एकेकाळी मुंबई पोलीस हे नाव ऐकूण गँगस्टर्स बिळात लपून बसायचे. पण तशी परिस्थिती आता राहिली नसल्याचं दिसून येतंय. आधी कायद्याचा धाकच इतका होता की कोणताही गुन्हा करताना गुन्हेगार दहा वेळ विचार करायचा. आता तसं काहीच राहिलं नाही हे वास्तव आहे. 


राजकारणाचं गुन्हेगारीकरण आणि गुन्हेगारांचे राजकारण्यांसोबतचे संबंध, यामुळे राजकीय गुन्हेगारांना काहीच भीती उरली नाही. त्यातून मग सत्ताधारी पक्षाचा एक आमदार सहकारी पक्षाच्या नेत्याला थेट पोलीस स्टेशनमध्येच गोळ्या घालतो. 


सत्ताधारी बेजबाबदार? 


राज्यात एकामागून एक गुन्हे होत घडत असताना, राज्याची तुलना यूपी बिहारशी होत असताना सत्ताधारी मात्र तेवढेच सुस्त असल्याचं दिसून येतंय. ते करणार तरी काय, कारण सत्तेत बसलेल्या लोकांशी संबंधित लोकच उघड गुन्हे करताना दिसत आहेत. त्यातून मग अजित पवार म्हणतात की, महेश गायकवाड यांच्याकडेही पिस्तुल होतं, त्यांनी ते चालवलं असतं तर अनर्थ घडलं असतं. तर दुसरीकडे राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणतात की, वैयक्तिक वादातून या घटना घडत आहेत, उद्या गाडीखाली श्वान आलं तरी विरोधी पक्ष राजीनामा मागतील. 


प्रश्न हा वैयक्तिक वादाचा आणि राजकारणाचा नाही तर राज्यातील घसरत्या कायदा आणि सुव्यवस्थेच्या स्थितीचा आहे. त्यामुळे सर्वच राज्यकारण्यांच्या बेजाबदार वागण्यामुळे महाराष्ट्राचा गँग्ज ऑफ वासेपूर झालाय हेच म्हणावं लागेल. 


ही बातमी वाचा: