Sanjay Raut on Devendra Fadnavis : पुण्यात अट्टल गुंड शरद मोहोळची दिवसाढवळ्या हत्या, त्यानंतर भाजप आमदार गणपत गायकवाड यांनी शिंदे गटाच्या महेश गायकवाड यांच्यावर पोलीस स्टेशनमध्येच केलेला गोळीबार ताजा असतानाच दहिसरमध्ये अभिषेक घोसाळकर यांची गोळ्या घालून हत्या करण्यात आल्यानंतर गृहमंत्री देवेंद्र फडणवीस विरोधकांच्या रडारवर आले आहेत.


तुमच्या राजवटीत महाराष्ट्रीयन कुत्र्याचे जीवन जगत आहे


राज्यात गुंडगिरीचा हैदोस सुरुच असल्याने विरोधकांकडून सातत्याने देवेंद्र फडणवीस यांच्या राजीनामाची मागणी होत आहे. मात्र, देवेंद्र फडणवीस यांनी विरोधकांच्या राजीनाम्याच्या मागणीवर गाडीखाली कुत्रं आलं, तरी विरोधक राजीनामा मागतील अशी प्रतिक्रिया दिली. यानंतर आता शिवसेना खासदार संजय राऊत यांनी फडणवीस यांनी केलेल्या टीकेचा समाचार घेतला आहे. संजय राऊत यांनी ट्विट करून फडणवीस साहेब, विसरू नका, तुमच्या राजवटीत महाराष्ट्रीयन कुत्र्याचे जीवन जगत आहे, अशी बोचरी टीका केली आहे. 






संजय राऊत यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे की, कुत्रं गाडीखाली आलं, तरी विरोधक राजीनाम्याची मागणी करतील, असे देवेंद्र फडणवीस म्हणाले. फडणवीस साहेब, विसरू नका, तुमच्या राजवटीत महाराष्ट्रीयन कुत्र्याचे जीवन जगत आहेत. शिंदे-फडणवीस सरकार मुंबईत भुंकते आणि दिल्ली मास्टर्सपुढे शेपूट हलवतात. भुंकत राहा आणि वाजवत राहा, तुमच्याकडून आणखी काय अपेक्षा करू? तुम्ही महाराष्ट्राची शांतता पूर्णपणे भंग केली आहे.


दरम्यान, पुण्यामध्ये आज (9 फेब्रुवारी) निर्भय बनो कार्यक्रमासाठी पोहोचलेल्या ज्येष्ठ पत्रकार निखिल वागळे यांच्यावर कार्यक्रमासाठी पोलिस बंदोबस्तात पोहोचत असतानाही चारवेळा गाडी फोडण्यात आली. भाजपच्या कार्यकर्त्यांकडून वागळे यांच्या गाडीवर हल्ला करण्यात आला. या घटनेवरुनही संजय राऊत यांनी फडणवीस यांच्यावर सडकून टीका केली आहे. 






भाजपकडून लोकशाहीचा खून करण्याचा निर्लज्ज प्रयत्न


त्यांनी अन्य ट्विटमध्ये म्हटले आहे की, अनेक महाविकास आघाडीच्या महिला कार्यकर्त्यांना भाजपच्या गुंडांनी मारहाण केली, त्यांच्यावर अंडी, दगड, विटा फेकल्या, पुणे पोलीस प्रेक्षक राहिले. ज्येष्ठ पत्रकार निखिल वागळे यांच्या गाडीवर फोडली, शाई, अंडी फेकली. पुण्यात भाजपकडून लोकशाहीचा खून करण्याचा निर्लज्ज प्रयत्न झाला. एमव्हीए खचून जाणार नाही, देवेंद्र फडणवीस लाज वाटते तुमची, तुम्ही तुमच्या कार्यकर्त्यांना महाराष्ट्राच्या लेकींना इजा करण्याचा आदेश देत आहात. महाराष्ट्र तुम्हाला माफ करणार नाही.


इतर महत्वाच्या बातम्या