भिवंडी : किरकोळ कारणावरून एका 25 वर्षीय तरुणावर त्याच परिसरात राहणाऱ्या चार गाव गुंडांनी भर रस्त्यात गाठून चॉपर आणि तलवारीने जीवघेणा हल्ला केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. ही घटना भिवंडी शहरातील चरणी पाडा परिसरात घडली आहे. याप्रकरणी नारपोली पोलीस ठाण्यात हल्लेखोर यांच्या विरोधात जीवे ठार मारण्यात प्रकरणी गुन्हा दाखल करून चौघांना अटक केली आहे. गेनू बांगारे, मनोज बांगारे, गोपी गिरी, अमित रायत असे अटक केलेल्या हल्लेखोरांची नावे आहेत तर अमोल माने वय 25 वर्ष असे हल्ल्यात गंभीर झालेल्या तरुणाचे नाव आहे.
भिवंडी तालुक्यातील चरणी पाडा परिसरात अमोल माने कुटुंबासह राहतो. काल रात्रीच्या सुमारास अमोल भरधाव वेगाने आपली चारचाकी परिसरातून घेऊन जात असताना आरोपीला याचा राग आला. हा आमच्या जवळून एवढा वेगाने कार घेऊन कसा जातो याचा राग मनात धरून या गाव गुंडाने घराजवळ येऊन अमोल माने याच्यावर चॉपर तलवार व लोखंडी रॉडने अचानक जीवघेणा हल्ला केला. हल्ला केल्याचे पाहून अमोलचे वडील व त्यांचे भाऊ हे मध्यस्थी करण्यासाठी आले. मात्र त्यांनाही या गाव गुंडाने जखमी केले. सध्या अमोलवर एका खाजगी रुग्णालयात उपचार सुरू असून त्याची परिस्थिती गंभीर आहे. याप्रकरणी नारपोली पोलीस ठाण्यात भादवि कलम 307 प्रमाणे गुन्हा दाखल करून आतापर्यंत चार हल्लेखोरांना पोलिसांनी अटक केली आहे
विशेष म्हणजे या हल्ल्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. याबाबत नारपोली पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक मदन बल्लाल यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी चार आरोपींना अटक केली असून या संपूर्ण प्रकरणात तपास करत असल्याचे त्यांनी सांगितले.