Ulhasnagar:  उल्हासनगरमध्ये उधारी मागितल्याच्या रागातून चायनिज विक्रेत्यावर धारदार शस्त्रानं हल्ला करण्यात आल्याची धक्कादायक घटना उघडकीस आलीय. कॅम्प नंबर 2 च्या हनुमाननगर परिसरात ही घटना घडली आहे. या हल्ल्यात चायनिज विक्रेता जखमी झाला आहे. याप्रकरणी पोलिसांनी आरोपीविरोधात गुन्हा दाखल केलाय.


मिळालेल्या माहितीनुसार, हनुमाननगर परिसरात ताराचंद्र यादव यांचे चायनिजचं दुकान आहे. या चायनिजच्या दुकानात आरोपी राहुल हा चायनीज खाण्यासाठी आला होता. मात्र, ताराचंदनं त्याला अगोदरची उधारी देण्यास सांगितलं. यामुळं राहुलला राग अनावर झाला. त्यानंतर राहुलनं त्याच्यासोबत आणलेल्या धारदार शस्त्रानं ताराचंद्राच्या हातावर, छातीवर अंगठ्यावर वार केले. या हल्ल्यात ताराचंद जखमी झाला. या प्रकरणी उल्हासनगर पोलिसांनी आरोपी राहुलच्या विरोधात गुन्हा दाखल केलाय. सध्या तो फरार असून त्याचा पोलीस शोध घेत आहेत.


वीजेचा धक्का लागल्यानं 19 वर्षीय तरूणाचा दुर्दैवी मृत्यू 
वीजेचा धक्का लागून एका 19 वर्षीय मुलाचा मृत्यू झाल्याची घटना उल्हासनगरच्या पंजाबी कॉलनी परिसरात घडली आहे. शफिउल्ला शहा असं वीजेचा धक्का लागून मृत्युमुखी पडलेल्या तरुणाचं नाव आहे. आज दुपारच्या सुमारास शफिउल्ला हा भंगारच्या दुकानात लोखंडी खुर्चीवर बसला असताना अचानक विजेचा धक्का लागला आणि तो खाली पडला. तात्काळ त्याला उपचारासाठी मध्यवर्ती रुग्णालयात हलविण्यात आलं. परंतु, उपचारापूर्वी त्याचा मृत्यू झालाय. शफिउल्ला यांचं पंजाबी कॉलनी परिसरात भंगारचं दुकान आहे. नेहमीप्रमाणे तो दुकानात गेला. परंतु, लोखंडी खुर्चीच्याखाली वायर शॉर्ट झाल्यामुळं त्याचा संपर्क लोखंडी खुर्चीशी आला आणि वीजेचा धक्का लागला. या घटनेनंतर परिसरात शोककळा पसरलीय.


हे देखील वाचा- 



LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha