Imran Khan, Prime Minister of Pakistan : पाकिस्तानात राजकीय भूकंप झाला आहे. पंतप्रधान इम्रान खान यांच्याविरोधात विरोधक एकवटले आहेत. विरोधकांना उत्तर देण्यासाठी इम्रान खान यांनी मोठं शक्तिप्रदर्शन केलं आहे. इस्लामाबादमध्ये इम्रान खान यांनी मोठी रॅली काढली आहे. यात जवळपास 10 लाख समर्थक जमा झाल्याची माहिती समोर आली आहे. इम्रान खान जनतेशी संवाद साधणार आहेत. यात ते राजीनामा देण्याची घोषणा करण्याची शक्यता आहे. कारण, अचानक इम्रान खान यांचे 50 मंत्री गायब झाले आहेत. त्यामुळे विरोधकांप्रमाणेच इम्रान खान यांना स्वपक्षीय आणि मित्रपक्षांकडूनही विरोध असल्याचे बोलले जात आहे.
8 मार्च रोजी विरोधकांनी इम्रान खान सरकारविरोधात अविश्वासाच्या प्रस्तावाची नोटीस दिली होती. त्यानंतर पाकिस्तानात राजकीय अस्थिरतेचं वातावरण निर्माण झालं. देशातील आर्थिक संकट आणि वाढत्या महागाईला इम्रान खान यांच्या नेतृत्वाखालील पाकिस्तान तेहरीक-ए-इन्साफ सरकार जबाबदार असल्याचा आरोप विरोधी पक्षांनी केलाय. आता क्रिकेटपटूतून राजकारणी झालेले इम्रान खान सध्या आपले सरकार वाचवण्यासाठी धडपडत करतायेत. तर दुसरीकडे पाकिस्तानातील 50 मंत्री अचनाक गायब झाल्याचं वृत्त आहे. यावरुन पंतप्रधान इम्रान खान यांनी विरोधकांवर निशाणा साधला असून खासदारांच्या घोडेबाजारात विरोधक गुंतले असल्याचा आरोप त्यांनी केला आहे. दुसरीकडे इम्रान खान आपल्या विरोधातील अविश्वास प्रस्तावावर मतदान करण्यापूर्वी इस्लामाबादमध्ये एका मोठ्या सभेला संबोधित करत आहेत. या सभेत इम्रान खान पंतप्रधान पदाचा राजीनामा देणार असल्याचे वृत्त आहे.
मित्रपक्षांनी सोडली साथ –
इम्रान खान यांच्यावर पक्षासाठी परदेशातून पैसा गोळा करून स्वतःसाठी वापरल्याचा आरोप आहे. यासाठी सोमवारी त्यांना अटक केली जाऊ शकते असे म्हटले जात आहे. त्याआधी पाकिस्तानमधील राजकीय हालचालींना वेग आला आहे. विरोधक आक्रमक झाले असतानाच इम्रान खान यांच्या मित्रपक्षांनी साथ सोडली आहे. एमएनए शाहजैन बुगती यांनी राजीनामा दिला आहे, तसेच सत्ताधारी पक्षाचा पाठिंबा काढल्याचा सांगितले आहे. तसेच आम्ही विरोधकांसोबत उभे असल्याचे त्यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. त्यामुळे इम्रान खान यांच्यापुढील अडचणी वाढल्या आहेत.
इम्रान खान राजीनामा देणार का?
शुक्रवारीच इम्रान खान यांच्याविरोधात अविश्वास प्रस्ताव मांडण्यात येणार होता, पण संसदेचे कामकाज लवकर संपल्याने अविश्वास प्रस्ताव मांडला गेला नाही. आता 4 एप्रिल रोजी अविश्वास प्रस्ताव मांडला जाणार असल्याचे म्हटले जात आहे. इम्रान खान राजीनामा देणार की नाही, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. मात्र त्यांच्या राजीनाम्याच्या चर्चा सध्या जोरात सुरू आहे. इमरान खान यांनी मी कोणाच्याही दबावात येऊन राजीनामा देणार नसल्याचे सांगितले आहे. इमरान खान यांच्या विरोधातील अविश्वास प्रस्तावावर 3 आणि 4 एप्रिल रोजी मतदान होणार आहे. इम्रान खान यांना पाकिस्तान निवडणूक आयोगाकडून नोटिस मिळत आहे.