Solapur: सोलापूरात काकूच्या नावाने असलेले घर त्यांच्या मृत्यूपश्चात वारसा हक्काने मिळवण्यासाठी चक्क न्यायाधिशांची बनावट सही आणि शिक्क्यांचा वापर करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार सोलापूरात उघडकीस आला आहे. नजीर अहमद पल्ला, असे या प्रकरणातील आरोपीचे नाव आहे. सोलापूरातल्या सदर बझार पोलिस ठाण्यात या प्रकरणात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. सरकारी पक्षातर्फे नगर भूमापन कार्यालयातील परिक्षण भूमापक समीर खाटीक यांनी फिर्याद दाखल केली आहे.  


आरोप नजीर अहमद पल्ला यांचे बंधू शौकत पल्ला यांनीच या सगळ्या प्रकरणात तक्रार दिली होती. शौकत आणि  नजीर अहमद पल्ला यांच्या काकू शरीफाबी पल्ला यांच्या नावे सोलापूरातील बुधवार पेठ येथील सुमारे दोन हजार स्केअर फूट मिळकत आहे. ज्यामध्ये चार खोल्यांचे घर आणि दुकान देखील आहे. या जागी तक्रारदार शौकत पल्ला हे अनेक वर्षांपासून काका-काकूसोबत राहावयास आहेत. काकू शरीफाबी पल्ला यांच्या 12 मे 2008 रोजी मृत्यू झाला. त्यानंतर काही वर्षांनी तक्रारदार शौकत पल्ला आणि नजीर पल्ला या दोघांमध्ये काही वाद झाले. तेव्हापासून  नजीर अहमद पल्ला यांनी ही मिळकत बळकवण्याचा डाव आखला होता. 


बनावट वारस प्रमाणपत्र तयार करुन केली फसवणूक


मृत शरीफाबी यांना अपत्य नसल्याने आरोपी  नजीर अहमद पल्ला याने बनावट वारस प्रमाणपत्र तयार केले. त्यासाठी दिवाणी न्यायधिशांचा बनावट शिक्का तयार केला. तसेच बनावट स्वाक्षरी करत प्रमाणपत्र तयार केले. धक्कादायक बाब म्हणजे बनावट प्रमाणपत्र नगर भूमापन कार्यलयाकडे सादर करून जागा स्वत:च्या नावावर करून घेतली. विशेष म्हणजे याच घरात भाड्याने राहणाऱ्या भाडेकरुला कवडी मोल भावात ही जागा विकली देखील. बुधवार पेठ ते सोलापूर एसटी बस स्थानक येथील मुख्य रस्त्यावर बाजारभावाप्रमाणे मिळकतीचे मुल्य हे जवळपास 1 कोटी रुपये इतके आहे. मात्र आरोपी नजीर पल्ला याने अवघ्या 13 लाख रुपये इतक्या कवडी मोल भागात ही मिळकत विकून देखील टाकली. असल्याची माहिती तक्रारदार शौकत पल्ला यांनी दिली. 


भाडेकरुंनी भाडे देणे बंद केल्याने प्रकार आला उघडकीस


सदर जागेवर चार खोल्यांचे घर आणि एक दुकान आहे. जागा मोठी असल्याने शौकत पल्ला यांनी भाडेकरू ठेवला होता. गेल्या अनेक महिन्यापासून या भाडेकरुने भाडे देणे बंद केले होते. भाडेकरूचा करारपत्र एप्रिल 2022 साली संपणार होता. त्यामुळे शौकत पल्ला यांनी मार्च महिन्याच्या सुरुवातीला भाडेकरूस जागा रिकामे करण्यास सांगितले. पण भाडेकरूने ही जागा आपण विकत घेतली असल्याची माहिती दिली. तसेच खरेदी व्यवहाराचे कागदपत्रे दाखविले. यावेळी पल्ला यांनी कार्यालयात जाऊन अधिक चौकशी केली असता भाऊ  नजीर अहमद पल्ला याने हा व्यवहार केल्याची माहित लक्षात आली. त्यानंतर शौकत पल्ला यांनी प्रहार जनशक्ती संघटनेचे जमीर शेख यांच्याशी संपर्क केला. जमीर शेख यांनी संपूर्ण प्रकरण तपासून पाहिले असता न्यायलयाचा बनावट शिक्का आणि सहीचा वापर झाल्याचा प्रकार समोर आला. दरम्यान या प्रकरणी सोलापुरातील सदर बझार पोलिस ठाण्यात  भादंवि कलम 419, 420, 465, 467, 468, 471 प्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आला असून आरोपीचा शोध सुरु असल्याची माहिती पोलिस निरीक्षक पोपटराव धायगुडे यांनी दिली.