मुंबई: मी एकटा म्हणजेच बहुमत आहे असं महत्वपूर्ण वक्तव्य वक्तव्य कर्नाटकचे प्रदेशाध्यक्ष डीके शिवकुमार यांनी केलं आहे. आपल्यामागे काँग्रेसचे बहुसंख्य आमदार असल्याचा दावा या आधी सिद्धारमय्या यांनी केला होता. त्यानंतर डीके शिवकुमार यांनी केलेल्या या वक्तव्याला महत्त्व प्राप्त होतंय. कर्नाटकात मुख्यमंत्री कोण होणार यांचा निर्णय कोणत्याही एक दोन दिवसात होऊ शकतो, त्या पार्श्वभूमीवर डीके शिवकुमार यांनी सूचक वक्तव्य केलंय
काँग्रेसमधील बहुसंख्य आमदार आपल्या मागे असल्याचा दावा
कर्नाटकचा मुख्यमंत्री कोण ही संदिग्धता अजूनही संपली नाही. त्याचा निर्णय घेण्यासाठी सर्व आमदारांनी राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांना सर्वाधिकार दिले आहेत. माजी मुख्यमंत्री सिद्धारमय्या आणि प्रदेशाध्यक्ष डीके शिवकुमार हे मुख्यमंत्रीपदाचे प्रबळ दावेदार असून या दोघांपैकी कुणाला मुख्यमंत्री करायचं याची खलबते दिल्लीत सुरू आहे. या दोन्ही नेत्यांना आज दिल्लीमध्ये बोलवण्यात आलं आहे.
काय म्हणाले डीके शिवकुमार?
आपल्याकडे आमदारांचं बहुमत आहे असा क्लेम सिद्धारमय्या यांनी केला आहे. त्यावर प्रत्युत्तर देताना डीके शिवकुमार म्हणाले की, धाडस असलेला व्यक्ती एकटा बहुमत निर्माण करु शकतो. मी एकटा म्हणजे बहुमत आहे. माझ्या नेतृत्वात आज कर्नाटकात 135 आमदार निवडून आले आहेत. काँग्रेस नेत्या सोनिया गांधी, राहुल गांधी आणि प्रियंका गांधी यांना कर्नाटक जिंकून देण्याचं मी वचन दिलं होतं, ते मी पूर्ण केलं आहे.
गेल्या पाच वर्षामध्ये काय काय झालं हे मी जाहीर करणार नाही. माझ्याकडे मुख्यमंत्रीपदासाठी पूर्ण संख्या असून ती नेमकी किती हे आता सांगत नाही असं डीके शिवकुमार म्हणाले.
काँग्रेसने डीके शिवकुमार आणि सिद्धारमय्या यांना दिल्लीत बोलवलं असून एक-दोन दिवसात मुख्यमंत्रीपदाचा फैसला होऊ शकतो अशी चर्चा आहे. कर्नाटकातील नवा मुख्यमंत्री गुरुवारी शपथ घेणार असून त्याच्यासोबत 25 मंत्रीही शपथ घेतील अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.