Latur  Crime News : लातूर (Latur) जिल्ह्यातील औसा तालुक्यातील भादा पोलिस ठाणे हद्दीतील वडजी गावातील एका युवकाचा झोपेत असताना डोक्यात व गळ्यावर वार करून अत्यंत निर्दयीपणे खून (Murder) केल्याची घटना शनिवारी उघडकीस आली होती. या घटनेबाबत पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल करत तपास सुरु केला होता. दरम्यान, आईसोबत नको त्या संबंधांचा संशय आल्याने मयत तरुणाच्याच मित्रानेच त्याची हत्या केल्याचं आता पोलीस तपासात समोर आले आहे. रणजित उर्फ बाळू तानाजी माळी (वय 22 वर्ष) असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे.


रणजित हा अविवाहित असून आई-वडीलांना शेती व्यवसायात मदत करून दुग्ध व्यवसाय करायचा. शुक्रवारी नेहमीप्रमाणे रणजित आपल्या शेतात मुक्कामी गेला असताना रात्री उशिरा किंवा पहाटेच्या वेळी अज्ञात मारेकऱ्याने झोपेत असताना त्याच्या डोक्यात व गळ्यावर अत्यंत निर्दयीपणे धारधार कोयत्याने वार करून त्याचा खून केला. ही घटना शनिवारी रोजी सकाळी आठ वाजण्याच्या सुमारास उघडकीस येताच याची माहिती भादा पोलिसांना देण्यात आली. सदरील घटनेची माहिती समजताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले आणि त्यांनी तपास सुरु केला होता. 


असा अडकला आरोपी... 


दरम्यान, पोलिसांकडून गावात चौकशी सुरु असतानाच मृत रंजितचे एका महिलेशी अनैतिक संबंध होते आणि तिचा मुलगा रंजितचा खूप जवळचा मित्र असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. पोलिसांनी तात्काळ एका 17 वर्षीय मुलास चौकशीसाठी ताब्यात घेतले. त्याला विचारपूस केली असता त्याने उडवाउडवीची उत्तरे दिले. दरम्यान, याचवेळी याच तरुणाने गावातील एका मुलाकडून कोयत्याला धार लावून नेल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यामुळे पोलिसांनी त्याची कसून चौकशी केली असता त्याने खुनाची कबुली दिली.


आदल्या दिवशी कोयत्याला धार लावून आणली...


मयत रंजित आणि आरोपी दोघेही चांगले मित्र होते. त्यामुळे एकमेकांच्या घरी त्यांचे येणेजाणे असायचे. दरम्यानच्या काळात रंजित आणि आपल्या आईचे अनैतिक संबंध असल्याचा आरोपीला संशय आला होता. त्यामुळे त्याने काही दिवस पाळत ठेवत खात्री केली. त्यामुळे मयत रंजितला कायमचे संपवण्याचा त्याने निर्णय घेतला. त्यानुसार आदल्या दिवशी कोयत्याला धार लावून आणली आणि रात्री रंजित गोठ्यात झोपला असतानाच त्याचा खून केला. 


इतर महत्वाच्या बातम्या: 


Pune Crime News : बहिणीसोबत अनैतिक संबंध असल्याचा संशय; 25 वर्षीय तरुणाची निर्घृणपणे हत्या