ISRO XPoSat Mission: श्रीहरिकोटा : इस्त्रोच्या (ISRO) 'एक्स्पोसॅट' उपग्रहाचं आज प्रक्षेपण होणार आहे. या मोहिमेद्वारे कृष्णविवरांसारख्या (ब्लॅक होल) खगोलीय निर्मितीमागील रहस्य उकलण्याचा प्रयत्न करण्यात येणार आहे. ऑक्टोबरमधील गगनयान चाचणी वाहन 'डी 1 मिशन'च्या यशानंतर हे प्रक्षेपण करण्यात येत आहे. या मोहिमेचे आयुष्य सुमारे पाच वर्षांचे असेल. ही भारताची पहिली समर्पित 'पोलरिमीटर' मोहीम आहे. त्यामुळे कृष्णविवरांच्या रहस्यमय बाबींचा अभ्यास करण्यास मदत होईल. तर  मुंबईतील के.जे.सोमय्या महाविद्यालयातील विद्यार्थ्यांचा प्रायोगिक सॅटेलाईटचंही प्रक्षेपण होणार आहे.


1 जानेवारी 2024 रोजी सकाळी 9 वाजता इस्रो इतिहास रचणार आहे. XPoSAT उपग्रह वर्षाच्या पहिल्या दिवशी श्रीहरिकोटा येथील सतीश धवन अंतराळ केंद्रातून प्रक्षेपित केला जाईल. हा उपग्रह अवकाशात होणाऱ्या किरणोत्सर्गाचा अभ्यास करेल. त्यांच्या स्रोतांचे फोटो घेतील. त्यात बसवलेली दुर्बीण रमण संशोधन संस्थेनं बनवली आहे. हा उपग्रह विश्वातील 50 तेजस्वी स्रोतांचा अभ्यास करणार आहे. जसं- पल्सर, ब्लॅक होल एक्स-रे बायनरी, सक्रिय गॅलेक्टिक न्यूक्ली, नॉन-थर्मल सुपरनोव्हा. हा उपग्रह 650 किमी उंचीवर पाठवण्यात येणार आहे.  


2017 मध्ये इस्रोनं हे अभियान सुरू केलं होतं. या मोहिमेचा खर्च 9.50 कोटी रुपये आहे. प्रक्षेपणानंतर सुमारे 22 मिनिटं, एक्सपोसॅट उपग्रह त्याच्या नियुक्त कक्षेत तैनात केला जाईल. या उपग्रहामध्ये दोन पेलोड्स आहेत. पहिला - पोलिक्स (POLIX) आणि दुसरा - एक्सपेक्ट (XSPECT).






Polix म्हणजे काय? 


पोलिक्स हा या उपग्रहाचा मुख्य पेलोड आहे. हे रमण संशोधन संस्था आणि यूआर राव सॅटेलाइट सेंटर यांनी संयुक्तपणे तयार केले आहे. 126 किलो वजनाचे हे उपकरण अवकाशातील स्रोतांचे चुंबकीय क्षेत्र, रेडिएशन, इलेक्ट्रॉन इत्यादींचा अभ्यास करेल. हे 8-30 keV श्रेणीच्या ऊर्जा बँडचा अभ्यास करेल. पोलिक्स अवकाशातील 50 पैकी 40 तेजस्वी वस्तूंचा अभ्यास करेल.


XSPECT म्हणजे काय? 


XSPECT म्हणजे, एक्स-रे स्पेक्ट्रोस्कोपी आणि वेळ. ते 0.8-15 keV श्रेणीच्या ऊर्जा बँडचा अभ्यास करेल. म्हणजेच, ते पोलिक्सच्या श्रेणीपेक्षा कमी ऊर्जा बँडचा अभ्यास करेल. हे पल्सर, ब्लॅक होल बायनरी, कमी-चुंबकीय क्षेत्राचे न्यूट्रॉन तारे, मॅग्नेटार इत्यादींचा अभ्यास करेल.


नासानं देखील केलाय अभ्यास


भारतीय अंतराळ एजन्सी ISRO व्यतिरिक्त, यूएस स्पेस एजन्सी NASA ने डिसेंबर 2021 मध्ये सुपरनोव्हा स्फोटाचे अवशेष, कृष्णविवरांमधून बाहेर पडणाऱ्या कणांचे प्रवाह आणि इतर खगोलीय घटनांवर असाच अभ्यास केला होता. इस्रोने सांगितले की, क्ष-किरण ध्रुवीकरणाचा अवकाश-आधारित अभ्यास आंतरराष्ट्रीय स्तरावर महत्त्वाचा ठरत आहे आणि या संदर्भात EXPOSACT मिशन महत्त्वपूर्ण भूमिका बजावेल.