Pune Crime News : बहिणीसोबत अनैतिक संबंध असल्याच्या संशयावरून (Pune Crime News)  एका 25 वर्षीय तरुणाचा निर्घृणपणे खून करण्यात आलाय. पुण्यातील बालेवाडी (Balewadi) परिसरात ही घटना घडली. चतु: शृंगी पोलीस ठाण्यात (Chaturshringi Police Station) या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून दोघांना अटक करण्यात आली आहे. राजेश कांबळे (वय 25) असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी राहुल शेषराव रिकामे (वय 20) आणि सय्यद जमीर उर्फ साहिल उर्फ बाब्या सय्यद नुर (वय 20) अशी आरोपींची नावे आहेत. याप्रकरणी एका अल्पवयीन तरुणाने तक्रार दिली आहे.

  


पोलिसांनी दोघांना केली अटक (Pune Crime News)


पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी आणि आरोपी एकमेकांच्या ओळखीचे आहेत. आरोपी राहुल रिकामे याला राजेश याचे आपल्या बहिणीसोबत अनैतिक संबंध असल्याचा संशय होता. याच संशयातून त्याने लोखंडी हत्यारांनी वार करत राजेश कांबळे याला ठार मारले. त्यानंतर त्याची गाडी वाकड येथील नदीमध्ये टाकून देऊन पुरावा नष्ट केला आहे. पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल करत दोघांना अटक केली आहे. अधिक तपास चतु:श्रृंगी पोलीस करत आहेत.


हत्येचं सत्र सुरुच


काहीच दिवसांपूर्वी चक्क झोपमोड केल्यामुळे भाडेकरुकडून घरमालकाची हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली होती. घरासमोर दुचाकीचे जोरात हॉर्न वाजवून झोपमोड केल्यामुळे भाडेकरुने थेट घरमालकाची हत्या केली होती. भाडेकरूने मालकाला पाण्याच्या टाकीत बुडवून हत्या केली होती. पुण्यातील हडपसर रस्त्यावरील उरुळी देवाची परिसरात  घटना ही घडली होती. संतोष राजेंद्र धोत्रे असे अटक केलेल्या संशयिताचे नाव होतं तर दादा ज्ञानदेव घुले असे हत्या झालेल्या घरमालकाचे नाव होतं. आरोपी धोत्रे हा घुले यांच्या चाळीत भाडेकरू होता. धोत्रे दारू पिल्यानंतर घरात झोपायला गेला. त्यावेळी घुले यांनी घरासमोर दुचाकीचा जोरजोराने हॉर्न वाजवला. त्यामुळे झोपमोड झाल्याने धोत्रेने घुले यांना मारहाण केली होती. धोत्रे ने त्यानंतर पार्किंगमधील पाण्याच्या टाकीत घुले यांना बुडवून खून केला घुले रात्री उशिरापर्यंत घरी न आल्यामुळे कुटुंबीयांनी ते बेपत्ता झाल्याची पोलिसात तक्रार दिली होती. सध्या पुण्यात क्षुल्लक कारणावरुन होणाऱ्या गुन्ह्यांमध्ये वाढ झाली आहे. रोज नवे गुन्हे समोर येत आहेत. क्षुल्लक कारणावरुन भांडणं होतात, त्याच्या रागातून खून आणि हत्या करण्याच्या प्रमाणात वाढ झाली आहे.