Latur Crime : लातूर (Latur) शासकीय कार्यालयाशी संबंधित दोन बँक खात्यांतील (Bank Account) 22 कोटी 87 लाख 62 हजार 25 रुपयांच्या रकमेचा अपहार झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. महसूल शाखेतील एका या लिपिकाने विविध योजनांच्या सरकारी निधीतून सुमारे 22 कोटी 88 लाख रुपयांची रक्कम अधिकाऱ्यांची बनावट स्वाक्षरी करुन स्वतःसह भाऊ आणि भावाच्या दुकानातील कर्मचाऱ्यांच्या खात्यावर वळवून गैरव्यवहार केल्याचं उघड झालं. हा प्रकार 2015 ते 2022 असा एकूण सात वर्षांतील असून जलयुक्त शिवार अभियानांतर्गत (Jalyukta Shivar) निधी वितरणाचा आदेश काढल्यानंतर हा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी तहसीलदार महेश मुकुंद परांडेकर यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन चार जणांविरुद्ध एमआयडीसी पोलीस ठाण्यात (MIDC Police Station) गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस पुढील तपास करत आहेत. लिपिक मनोज नागनाथ फुलेबोयणे यांच्यासह अरुण नागनाथ फुलेबोयणे, सुधीर रामराव देवकते, चंद्रकांत नारायण गोगडे यांच्याविरोधात स्वतःच्या आणि इतर तिघांच्या खात्यात रक्कम जमा करुन शासनाची फसवणूक केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
काय आहे प्रकरण?
महसूल शाखेतील तत्कालीन लिपिक मनोज नागनाथ फुलेबोयणे यांच्याकडे बँक खात्याचा कारभार होता. जलयुक्त शिवार अभियानांतर्गत निधी वितरणाचा आदेश होता. जलसंधारण अधिकाऱ्यांना दोन धनादेश देण्यात आले होते. ज्यामध्ये 12 लाख 27 हजार 297 रुपये आणि 41 लाख 06 हजार 610 रुपये आरटीजीएसद्वारे वितरित करण्यासाठी स्टेट बँक ऑफ इंडियाच्या जुन्या जिल्हाधिकारी कार्यालय परिसरातील शाखेत आरटीजीएस फॉर्म जमा करण्यात आले होते. मात्र खात्यात केवळ 96 हजार 559 रुपये शिल्लक असल्याचे दिसून आले. यामुळे अपहार प्रकरणाचे धागेदोरे समोर आले आहेत. जिल्हाधिकाऱ्यांनी खात्यांचे लेखापरीक्षण करण्याचे आदेश काढले. तसेच अन्य एका खात्याचेही लेखापरीक्षण करण्यात आले. ज्यामध्ये स्वाक्षरी आणि मूळ रकमेत बदल केल्याचे निदर्शनास आढळून आले. शासकीय खासगी खात्यात वर्ग केल्याचे निदर्शनास आले.
कसा केला गुन्हा?
मनोज फुलेबोयणे या लिपिकाने बनावट प्राधिकारपत्र तयार केली. अधिकाऱ्यांच्या बनावट स्वाक्षऱ्या करुन शिक्क्यांचा गैरवापर केला. त्यातून कोट्यवधी रुपये भाऊ अरुण प्रोपायटर असलेल्या तन्वी कृषी केंद्र, तन्वी ॲग्रो एजन्सीज आणि ऋषीनाथ ॲग्रो एजन्सीजच्या बँक खाते तसेच सुधीर देवकते आणि चंद्रकांत गोगडे यांच्या बँक खात्यावर वर्ग केले. यासोबत धनादेशातील अक्षरी, अंकी रक्कमेच्या ठिकाणी रिकामी जागा ठेऊन त्यानंतर त्यात वाढ करुन रक्कम लाटली.
चार जणांविरोधात शासनाची फसवणूक केल्याचा गुन्हा
या प्रकरणी तहसीलदार महेश मुकुंद परांडेकर यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन मनोज नागनाथ फुलेबोयणे याच्याविरोधात स्वतःच्या आणि इतर तिघांच्या खात्यात रक्कम जमा करुन शासनाची फसवणूक केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अरुण नागनाथ फुलेबोयणे, सुधीर रामराव देवकते, चंद्रकांत नारायण गोगडे अशी आरोपींची नावं आहेत. एमआयडीसी पोलीस अधिक तपास करत आहेत. दरम्यान यावर पोलीस अधिकाऱ्यांनी प्रतिक्रिया देण्यास नकार दिला आहे.