Balasaheb Thackeray Portrait : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त (Balasaheb Thackeray Birth Anniversary) विधानभवनातील सेंट्रल हॉलमध्ये (Central Hall) त्यांच्या तैलचित्राचे अनावरण करण्यात आले. चित्रकार किशोर नादावडेकर (Kishor Nadavadekar) यांनी बाळासाहेब ठाकरे यांचे काढलेल्या तैलचित्राचे विधानभवनाच्या सेंट्रल हॉलमध्ये सोमवारी (23 जानेवारी) लावण्यात आले. विधानभवनातील सेंट्रल हॉलमधील लागणारे बाळासाहेब ठाकरे यांचे तैलचित्र ऐनवेळी बदलल्याने चित्रकार चंद्रकला कदम (Chadrakala Kadam) नाराज झाल्या आहेत. ऐनवेळी हे चित्र बदलणे म्हणजे बाळासाहेब ठाकरे यांनी एका चित्रकाराच्या दृष्टिकोनातून जो विश्वास माझ्यावर टाकला, त्या विश्वासाचा तुम्ही अपमान करु नये, अशी प्रतिक्रिया चित्रकार चंद्रकला कदम यांनी एबीपी माझाशी बोलताना दिली.
बाळासाहेबांनी चित्रकाराच्या दृष्टीकोनातून माझ्यावर टाकलेल्या विश्वासाचा अपमान : चंद्रकला कदम
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या हस्ते बाळासाहेब ठाकरे यांच्या तैलचित्राचे अनावरण झालं. बाळासाहेबांचे हे तैलचित्र चित्रकार किशोर नादावडेकर यांनी साकारले आहे. चंद्रकला कदम यांनी साकारलेले तैलचित्र विधानभवनाच्या सेंट्रल हॉलमध्ये न लावल्याने त्यांनी नाराजी व्यक्त केली. त्या म्हणाल्या की, "बाळासाहेब ठाकरे यांनी माझ्या चित्रकारितेच्या कौशल्यावर विश्वास ठेवून मला देशाच्या संसदेत त्यासोबत गुजरात विधानभवनमध्ये तैलचित्र काढण्याची संधी दिली होती. त्यानंतर मी महाराष्ट्राच्या विधानभवनातील सहा तैलचित्र साकारले आहेत. बाळासाहेब ठाकरे यांचे तैलचित्र साकारण्याची सरकारी ऑर्डर मला देण्यात आली. असे असताना ऐनवेळी हे चित्र बदलणे म्हणजे बाळासाहेब ठाकरे यांनी एका चित्रकाराच्या दृष्टिकोनातून जो विश्वास माझ्यावर टाकला, त्या विश्वासाचा तुम्ही अपमान करु नये."
चंद्रकला यांनी साकारलेले तैलचित्र मुख्यमंत्री दालनात लागणार?
दरम्यान विधानभवनातून मिळालेल्या माहितीनुसार चित्रकार चंद्रकला कदम यांनी साकारलेले बाळासाहेबांचे तैलचित्र मुख्यमंत्री दालनात लावले जाणार आहे.
उद्धव ठाकरे आणि कुटुंबियांनी उपस्थिती टाळली
विधानभवनातील शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या तैलचित्राचा अनावरण सोहळा काल 23 जानेवारी पार पडला. बाळासाहेब ठाकरे यांच्या 97 व्या जयंतीनिमित्त हे तैलचित्र लावण्यात आले आहे. या कार्यक्रमाला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, विरोधीपक्ष नेते अजित पवार, अंबादास दानवे, विधानपरिषदेच्या उपसभापती निलम गोऱ्हे, केंद्रीय मंत्री नारायण राणे, मनसे प्रमुख राज ठाकरे, अॅड. निहार ठाकरे, स्मिता ठाकरे, चित्रपट दिग्दर्शक महेश मांजरेकर, बॉलिवूड अभिनेता नवाजुद्दीन सिद्दीकी आदी उपस्थित होते.बाळासाहेब यांचे पुत्र उद्धव ठाकरे, सून रश्मी ठाकरे, नातू आदित्य आणि तेजस ठाकरे यांनी मात्र या सोहळ्याला उपस्थिती लावण्याचं टाळले.
संबंधित बातमी