Court Directs Cricketer Mohammed Shami to Pay Wife Hasin Jahan 1 lakh 30 Thousand Every Month: कोलकाता न्यायालयानं भारताचा वेगवान गोलंदाज मोहम्मद शमीला (Indian Cricketer Mohammed Shami) त्याची विभक्त पत्नी हसीन जहाँला (Hasin Jahan) महिन्याला 1 लाख 30 हजार रुपये पोटगी देण्याचे आदेश दिले आहेत. 1 लाख 30 हजार रुपयांपैकी 50 हजार रुपये हसीन जहाँसाठी वैयक्तिक पोटगी असेल आणि उर्वरित 80 हजार रुपये तिच्यासोबत राहणाऱ्या तिच्या मुलीच्या देखभालीसाठी असतील, असंही यावेळी न्यायालयानं स्पष्ट केलं आहे.
2018 मध्ये, हसीन जहाँने 10 लाख रुपयांच्या मासिक पोटगीची मागणी करत कोर्टात दावा दाखल केला होता. त्यापैकी 7 लाख रुपये तिची वैयक्तिक पोटगी आणि उर्वरित 3,00,000 रुपये तिच्या मुलीच्या देखभालीसाठी खर्च केले जातील, असंही कोर्टानं सांगितलं.
हसीन जहाँच्या वकील मृगांका मिस्त्री यांनी न्यायालयाला माहिती दिली की, भारतीय वेगवान गोलंदाजाच्या 2020-21 या आर्थिक वर्षाच्या आयकर रिटर्ननुसार, त्या आर्थिक वर्षासाठी त्याचे वार्षिक उत्पन्न 7 कोटी रुपयांपेक्षा जास्त होतं आणि त्यावर आधारित मासिक पोटगीची मागणी केली होती. त्यामुळे हसीन जहाँनं मागितलेली 10 लाखांची पोटगी अवाजवी नव्हती.
दरम्यान, मोहम्मद शामीचे वकील सेलिम रहमान यांनी दावा केलाय की, हसीन जहाँ स्वतः व्यावसायिक फॅशन मॉडेल म्हणून काम करत असून स्थिर उत्पन्न मिळवत असल्यानं, त्यांची उच्च पोटगीची मागणी योग्य नव्हती.
अखेर दोन्ही बाजू ऐकून घेतल्यानंतर कनिष्ठ न्यायालयानं सोमवारी मासिक पोटगीची रक्कम 1 लाख 30 हजार रुपये निश्चित केली. कोर्टाच्या निर्देशाबद्दल कृतज्ञता व्यक्त करताना हसीन जहाँनं दावा केला की, मासिक पोटगीची रक्कम जास्त असती तर तिला दिलासा मिळाला असता. याप्रकरणी अद्याप भारतीय वेगवान गोलंदाज मोहम्मद शामीकडून कोणतीही प्रतिक्रिया आलेली नाही.
गेल्या वर्षी सप्टेंबरमध्ये आशिया चषकात भारतीय संघानं पाकिस्तानविरुद्धच्या विजयानंतर, हसीन जहाँनं सोशल मीडियावर षटकार मारून भारताचा विजय मिळवणाऱ्या हार्दिक पांड्याचा फोटो शेअर केला आणि शामीवर निशाणा साधला होता.