Kalyan Latest Crime News : मुलांना घेऊन जाताना दुसऱ्या पत्नीशी पतीने वाद घातला. त्यावेळी या वादात तीन मेहुण्याने मिळून दाजीची (भावोजी) हातोडीने मारून हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. खळबळजनक बाब म्हणजे हातोड्याने प्रहार करून एका रिक्षातून अपहरण करत दाजीचा मृतदेह नदीत फेकल्याचे पोलीस तपासात समोर आले. याप्रकरणी खडकपाडा पोलीस ठाण्याच्या घटनेची नोंद करून संशयित तिन्ही मेहुण्याना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. इरशाद शेख, शोहेब शेख, हेमंत बिचवाडे असे  ताब्यात घेतलेल्या  मेहुण्याची नावे आहेत. तर  शेहबाज शेख ( वय 26 ) असे मृत दाजीचे  नाव आहे.  


मिळालेल्या माहितीनुसार मृतक  शेहबाज हा टिटवाळा नजीक बल्याणी गावात राहत होता. तर त्याची दुसरी पत्नी  मुमताज शहाड भागातील  बंदरपाडा परिसरात राहत आहे. मुमताज हिचा आदी निकाह झाला असून पहिल्या  पतीपासून तिला तीन मुलं आहेत. तर मृतक शेहबाज हा तिचा दुसरा पती म्हणून गेल्या साडेचार तिच्या सोबत राहत होता. मृत शेहबाजपासून मुमताजला दोन मुलं झाली आहेत. हीच दोन मुलं घेऊन जाण्यासाठी मृतक शेहबाज हा शुक्रवारी सायंकाळच्या सुमारास मुमताज राहत असलेल्या घरी आला. मात्र  मुलं घेऊन जाण्यास मुमताजने विरोध केल्याने पती पत्नीमध्ये वाद झाला. याच वादातून तीन मेहुण्यानी मिळून  ( दाजी) शेहबाज बेदम मारहाण करत  हातोडीने प्रहार केले.


या मारहाणीत दाजी बेशुद्ध झाल्याचे पाहून तिघांनी मिळून त्याच परिस्थिती घराबाहेर खेचत आणत रिक्षात जबरदस्तीने बसवून घेऊन गेले. विशेष म्हणजे तीन मेहुण्यामध्ये हेमंत बिचवाडे हा मुमताजच्या  आईवडिलांनी दत्तक घेतलेला मुलगा असल्याचे समोर आले.  दरम्यान शुक्रवारी रात्री १० वाजल्याच्या सुमारास मुमताज ही पती बेपत्ता झाल्याची तक्रार देण्यासाठी खडकपाडा पोलीस ठाण्यात आली होती. तिच्या तक्रारीवरून पोलिसांनी शेहबाज  बेपत्ता असल्याची नोंद करून तपास सुरू केला असता, सायंकाळच्या सुमारास तीन मेहुण्यानी मिळून बेदम मारहाण दाजीला  जबरदस्तीने  रिक्षात घेऊन गेले. असे पोलीस पथकला समजताच पोलिसांनी आज पहाटेच्या सुमारास   तिघांना ताब्यात घेतले.


त्यानंतर ताब्यात असलेल्या तीन मेहुण्याकडे पोलिसांनी चौकशी केली असता या तिघांनी मारहाण केल्याची कबुली देत, शेहबाज ला कल्याण मुरबाड रोड वरील पांजरपोळ नजीक नदी फेकल्याचे सांगितले. पोलिसांनी अग्निशमन दलाच्या जवानांच्या मदतीने शेहबाजचा नदी पात्रात आज सकाळपासून शोध घेत आहे. मात्र  जवळपास आता २४ तास उलटून गेले. दुसरीकडे शेहबाजचा थांगपत्ता लागला नसून  नदी पात्रात शोधकार्य सुरु असल्याची  माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक सर्जेराव पाटील यांनी दिली आहे. तर  याप्रकरणी खडकपाडा पोलिसांनी इरशाद शेख, सोयब शेख, हेमंत बिचवाडे या तिघांना  ताब्यात घेऊन  ज्या रिक्षातून अपहरण करण्यात आले. ती रिक्षा पोलिसांनी जप्त केली असून  पुढील तपास करत असल्याची माहितीही वरिष्ठ पोलीस निरीक्षक पाटील यांनी  दिली आहे.