Mumbai BEST Bus Strike :  बेस्ट परिवहन सेवेतील कंत्राटदारांच्या अखत्यारीत असलेल्या कंत्राटी चालकांनी विविध मागण्यांसाठी पुकारलेल्या संपाच्या (BEST Strike) पार्श्वभूमीवर राज्य सरकारने पावले उचलण्यास सुरुवात केली आहे. या संपामुळे सर्व सामान्य जनतेची गैरसोय होऊ नये, यासाठी खासगी वाहनांतून टप्पा प्रवासी वाहतूक करण्यास सरकारने मंजूरी दिली आहे. संप सुरू असेपर्यंत हे आदेश लागू असणार आहे. या निर्णयाबाबत सरकारने अधिसूचना जारी केली आहे. 


बेस्टचा संप सुरू असल्याने प्रवाशांचे हाल होत आहेत. ही बाब लक्षात घेता  मुंबई महानगर परिक्षेत्रातील सर्व प्रकारच्या सार्वजनिक सेवा वाहनांतून यामध्ये सर्व प्रकारच्या रिक्षा, टॅक्सी, खाजगी बसेस, स्कूल बसेस आदींमधून प्रवाशांच्या वाहतूकीस संप संपेपर्यंतच्या कालावधीसाठी टप्पा वाहतूक करण्यास परवानगी देण्यात येत आली आहे. 


मोटार वाहन अधिनियमानुसार, मुंबई महानगर परिक्षेत्रातील सर्व प्रकारच्या सार्वजनिक सेवा वाहनांतून (पी एस व्ही सर्व प्रकारच्या रिक्षा, टॅक्सी, खाजगी बसेस, स्कूल बसेस आदींमधून प्रवाशांच्या वाहतूकीस संप संपेपर्यंतच्या कालावधीसाठी टप्पा वाहतूक करण्यास शासनाने परवानगी दिली आहे. संप मागे घेतल्यास सदर अधिसूचना रद्द समजण्यात यावी, असे गृह (परिवहन) विभागाने आपल्या आदेशात स्पष्ट केले आहे. 


बेस्ट प्रशासनाकडून कंत्राटदारांसोबत चर्चा


कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या संपामुळे बेस्टची प्रवासी वाहतूक विस्कळीत झाली आहे. आज बेस्ट प्रशासनाने सर्व बस पुरवठादार व्यवसाय संस्था मालकांसोबत बैठक घेतली. या बैठकीत प्रशासनाने काम बंद  आंदोलनाबाबत त्वरित तोडगा काढण्याचे निर्देश दिले आहे. बेस्टकडून कंत्राटदारांना संपातील प्रति बस मागे 5000 रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे. 


आज सायंकाळी 4 वाजेपर्यंत बेस्टच्या मदतीसाठी 104 एसटी बसेस विविध मार्गांवर चालवण्यात आल्या आहेत. एसटी महामंडळाकडून जवळपास 150 बसेस बेस्टच्या मदतीला दिल्या आहेत. 


बेस्टमध्ये कंत्राटी बसेसचा समावेश का?


बेस्ट प्रशासन आर्थिक अडचणीत सापडलं आहे. खर्च कमी करण्यासाठी बेस्ट प्रशासनाने आपल्या ताफ्यात कंत्राटी पद्धतीने बस ताफ्यात घेण्यास सुरुवात केली. त्यासाठी निविदा काढण्यात आल्या. बस आणि चालक यांची नियुक्ती कंत्राटदाराकडून करण्यात येते. तर, निविदेत निश्चित केलेली रक्कम कंत्राटदाराला बेस्टला द्यावी लागते. यामुळे नवीन बस खरेदी आणि नवीन चालकांची नियुक्ती बेस्टला करावी लागत नाही. त्याच्या परिणामी बेस्टची काही प्रमाणात बचत झाली. कंत्राटदाराकडून बेस्टच्या मिनी एसी बस, एसी बस, इलेक्ट्रीक बस चालवण्यात येते. मुंबईत विविध आगारात वेगवेगळ्या कंत्राटदारांकडून सेवा पुरवण्यात येते.