ठाणे : लग्नानंतर हनीमूनला जाण्यावरून जावई आणि सासऱ्यामध्ये वाद झाला आणि त्याचा राग धरून सासऱ्याने जावयावर अॅसिड हल्ला केल्याची धक्कादायक घटना कल्याणमध्ये घडली. या प्रकरणी जावयावर रुग्णालयात उपचार सुरू असून सासरा फरार आहे. इबाद फालके असे जावयाचे नाव आहे तर जकी खोटाल असं सासऱ्याचं नाव आहे. बाजारपेठ पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा नोंदवला असून फरार सासऱ्याचा शोध सुरू केला आहे. 


नवीनच लग्न झाल्याने जावयाने हनीमूनला काश्मीरला जाण्याचा बेत आखला होता. तर जावयाने काश्मीरऐवजी पहिले प्रार्थनेसाठी मक्का-मदिनेला जावे, असा आग्रह सासऱ्याने जावयाकडे धरला होता. याविषयावरून सासरा-जावई यांच्यातील वादावादी वाढत गेली. त्यानंतर  सासऱ्याने आपल्या जावयाला कल्याण पश्चिमेतील लालचौकी भागात गाठले आणि त्याच्यावर ॲसिड हल्ला करून त्याला गंभीर जखमी केले. सासरा या घटनेनंतर पळून गेला असून बाजारपेठ पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. 


जावई काश्मीरला जाण्यासाठी ठाम


पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी जकी खोटाल यांच्या मुलीचे महिन्याभरापूर्वीच इबाद फालके याच्या बरोबर विवाह झाला आहे. त्यानंतर इबाद याने हनीमूनसाठी काश्मीरला जाण्याचे निश्चित केले होते. तर सासरा जकी याने काश्मीरला जाण्याऐवजी पहिला मक्का मदिना येथे प्रार्थनेसाठी जावे असा आग्रह जावयाकडे धरला. या विषयावरून सासरा आणि जावई यांच्यात शाब्दिक वादावादी सुरू होती. इबाद पत्नीसह काश्मीरला जाण्यावर ठाम होता. तर सासरा जकी यांचा त्यास विरोध होता. अनेक दिवस ही धुसफूस सुरू होती.


वाद झाल्यानंतर अॅसिड हल्ला केला


गुरुवारी रात्रीच्या सुमारास  जावई इबाद कल्याणमधील लाल चौकी भागातून आपल्या घरी पायी चालला होता. त्यावेळी त्याचा सासरा जकी खोटाल याने इबादला रस्त्यावर थांबवले आणि पुन्हा वाद सुरू केला. त्यावेळीही या दोघांमध्ये शाब्दिक वाद झाला. यावेळी संतप्त झालेल्या सासऱ्याने सोबत आणलेले ॲसिड अचानक जावयाच्या अंगावर फेकले. 


अचानक घडलेल्या या प्रकाराने इबाद अस्वस्थ झाला.त्याचवेळी सासरा तेथून पळून गेला. इबादच्या चेहरा आणि शरीराच्या इतर भागावर ॲसिडमुळे जखमा झाल्या आहेत. बाजारपेठ पोलिसांना ही माहिती मिळताच पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल करून पळून गेलेल्या जकी खोटाल याचा शोध सुरू केला आहे.


हनीमूनला जाण्यावरून जावई, सासरे यांच्यात काही दिवस वाद विवाद सुरू होते. या वादातून सासऱ्याने जावयावर ॲसिड हल्ला केला. फरार झालेल्या सासऱ्याच्या शोधासाठी पोलीसांची तपास पथके विविध ठिकाणी रवाना झाली आहेत.