ठाणे : क्रिकेट खेळण्याच्या बहाण्याने बोलावून एका अल्पवयीन मुलावर वॉचमनने लैंगिक अत्याचार केल्याची धक्कादायक घटना कल्याणमध्ये घडली आहे. कल्याणच्या महात्मा फुले पोलिस ठाण्यात या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी सुनील मिश्रा या वॉचमनला बेड्या ठोकल्या आहेत.


कल्याणमधील एका हायप्रोफाईल परिसरातील एक अल्पवयीन मुलगा त्याच्या आईला सांगून घरातून बाहेर निघाला. मित्रांसोबत आणि बंगल्याच्या वॉचमनसोबत क्रिकेट खेळतो असे सांगून तो बाहेर गेला. काही वेळेनंतर अल्पवयीन मुलगा पुन्हा घरी आला. आपल्यासोबत वॉचमनने घाणेरडेपणा केल्याचं त्याने नातेवाईकांना सांगितले. 


नेमकं काय घडलं?


मुलगा क्रिकेट खेळत असताना वॉचमनने लिफ्टच्या दिशेने चेंडू फेकला. मुलाने विचारले चेंडू कुठे आहे. तेव्हा वॉचमनने मुलाला लिफ्टकडे चेंडू आहे असं सांगून त्याठिकाणी चेंडू आणण्यासाठी पाठवले. तो  वॉचमन त्या मुलाच्या मागेच गेला. त्याठिकाणी मुलाला गाठून त्याने मुलावर लैंगिक अत्याचर केला आहे. 


मुलाने सांगितलेल्या माहितीनुसार त्याच्या कुटुंबीयांनी वॉचमनच्या विरोधात तक्रार दाखल केली. त्यानंतर पोलिसांनी वॉचमनला अटक केली. या प्रकरणाचा पुढील तपास कल्याणमधील महात्मा फुले पोलिस करत असून या वॉचमनने या आधी असे किती प्रकार केले आहे याचा तपास करण्यात येत आहे.