Jalna News : जालन्यातील (Jalna) अंबड तालुक्यातील शहागडमध्ये एक धक्कादायक प्रकार समोर आला असून, चारित्र्यावर संशय घेऊन पतीनेच पत्नीच्या डोक्यात कुऱ्हाडीने वार करून खून (Murder) केल्याची घटना उघडकीस आली आहे. शुक्रवारी सायंकाळी पाच वाजेच्या सुमारास ही घटना घडली असून, ज्योती दिलीप भारस्कर (वय 36 वर्षे रा. कोठाळा खु. ता. अंबड, ह.मु. डोंगरे वस्ती पैठण रोड शहागड) असे मयत महिलेचे नाव आहे. तर पत्नीची हत्या केल्यावर घटनास्थळावरून संशयित आरोपी दिलीप गणपत भारस्कर हा फरार झाला आहे. त्यामुळे पोलिसांकडून त्याचा शोध घेतला जात आहे. दरम्यान, या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे. 


पोलिसांकडून मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, मयत महिला ज्योती भारस्कर आणि दिलीप भारस्कर यांच्या विवाहाला 14  वर्षे झाली आहेत. लग्न झाल्यावर सुरुवातीला त्यांचा संसार चांगला चालला. दरम्यान, त्यांना तीन अपत्य झाली. मात्र, काही वर्षांपासून दिलीप भारस्कर हा ज्योती भारस्कर यांच्या चारित्र्यावर संशय घेत होता. त्यामुळे यावरून त्यांच्यात वाद देखील होत असे, तर सोबतच कौटुंबिक वादही सुरू होता. 


थेट डोक्यात कुऱ्हाडीने वार केला...


काही दिवसांपासून दिलीप भारस्कर हा ज्योती भारस्कर हे शहागड येथील डोंगरे वस्तीवरील वीटभट्टी येथे काम करीत होते. तर शुक्रवारी सायंकाळी पाच वाजेच्या सुमारास ज्योती भारस्कर आणि दिलीप भारस्कर या दोघांमध्ये पुन्हा वाद झाला. वाद एवढ्या विकोपाला गेला की, दिलीप भारस्कर याने रागाच्या भरात थेट ज्योती भारस्कर यांच्या डोक्यात कुऱ्हाडीने वार केले. त्यामुळे ज्योती या गंभीर जखमी झाल्या आणि त्यांचा जागीच मृत्यू झाला. 


पोलिसांची घटनास्थळी धाव...


दरम्यान, याबाबत शहागड पोलिसांना महिती मिळताच सपोनि. दीपक लंके यांनी घटनास्थळी धाव घेतली. पंचनामा करत मृतदेह शवविच्छेदनासाठी अंबड येथील रुग्णालयात पाठविण्यात आला. तर या प्रकरणी महादेव विश्वनाथ वाल्हेकर यांच्या फिर्यादीवरुन संशयित दिलीप भारस्कर याच्याविरुद्ध गोंदी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घटनास्थळाला डीवायएसपी सुनील पाटील यांनी भेट दिली आहे. तर संशयित आरोपी दिलीप भारस्कर हा घटनास्थळावरून फरार झाला आहे.  त्याचा शोध पोलीस घेत आहे. लवकरच त्याला अटक करण्यात येईल, अशी माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे. तसेच आरोपीला पकडण्यासाठी एक पथक मागावर असल्याचे देखील सांगण्यात आले आहे. 


इतर महत्वाच्या बातम्या : 


Crime News : ऑनलाईन गेममध्ये गमावले पैसे, अभियांत्रिकीचे शिक्षण घेतलेल्या तरुणाची तलावात आत्महत्या