Jalgaon News Update : कुजलेल्या मृतदेहाशिवाय कोणताही ठोस पुरावा नसताना तरुणाच्या खुनाचा उलगडा करण्यात जळगाव पोलिसांना यश आले आहे. भुसावळ शहरात रामदेव बाबा नगर भागात राहणाऱ्या रोहित कोप्रेकर हा तरुण आठ दिवसांपासून बेपत्ता झाल्याची तक्रार त्याच्या कुटुंबाने पोलिसात दिली होती. त्यावरून तपास कताना रोहित याचा खून झाल्याचे उघड झाले आहे.
जळगाव जिल्ह्यातील भुसावळ तालुक्यात वांजोळा गावा लगत 6 जून रोजी कुजलेल्या अवस्थेत एक मृतदेह आढळून आल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. या माहितीच्या आधारावर पोलिसांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली असता मृतदेह पूर्णपणे कुजलेल्या अवस्थेत आढळून आला होता. या ठिकाणी केवळ सांगाडा शिल्लक असल्याने पहिल्यांदा मृतदेहाची ओळख पटविण्याचे आव्हान पोलिसांच्या समोर होते.
मृतदेहाची चप्पल आणि त्याच्या अंगावर असलेल्या कपड्यांच्या माध्यमातून पोलिसांनी मयताची ओळख पटविण्याचा प्रयत्न केला. याच दरम्यान जिल्ह्यात हरविलेल्या व्यक्तींची माहिती घेण्यास सुरुवात केली असता भुसावळ शहरात रामदेव बाबा नगर भागात राहणाऱ्या रोहित कोप्रेकर हा तरुण आठ दिवसांपासून बेपत्ता झाल्याची तक्रार त्याच्या कुटुंबाने पोलिसांत दिल्याची माहिती मिळाली.
या तक्रारीचा आधार घेत पोलिसांनी रोहित याचे कपडे आणि चप्पलच्या माध्यमातून मृतदेह हा रोहित कोप्रेकार याचाच असल्याचं निष्पन्न केले होते. रोहितचां मृतदेह ज्या ठिकाणी पडला होता त्या ठिकाणी रक्ताने माखलेले दगड आणि कपडे देखील आढळून आले. त्यामुळे रोहितचा खून झाला असल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी बांधला होता. मृतदेह पूर्णपणे कुजला असल्याने शवविच्छेदना देखील कारण स्पष्ट होणे कठीण होते.
मयत रोहित याचा खून झाला असला तरी तो कोणी आणि का केला? या बाबत कोणताही ठोस पुरावा समोर नसल्याने पोलिसांना त्याचा तपास करणे मोठे आव्हान होते.
मित्रांनीच केला खून
ज्या भागात रोहितचा मृतदेह आढळून आला, त्या भागात असलेल्या हॉटेलमधील सीसी फुटेजची पोलिसांनी तपासणी केली असता रोहित बेपत्ता झाला, त्या दिवशी त्याच्यासह अन्य दोन तरुण एका हॉटेलात दारू पीत असल्याचं फुतेजमध्ये आढळून आले. हाच धागा पकडून पोलिसांनी या दोन्ही तरुणांची कसून चौकशी केली. पोलिसी खाक्या दाखवताच त्याच दोन मित्रांनी दोरीने गळा आवळून रोहित याची हत्या केल्याचं कबूल केले.
दरम्यान, अद्याप या घटने मागील कारणाचां पोलीस तपास करत आहे. परंतु, प्रेम प्रकरणातून रोहित याचा खून करण्यात आल्याचा अंदाज वर्वला जात आहे. भुसावळ शहरातील बाजारपेठ पोलीस ठाण्यात रोहित याच्या खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याच्या दोन मित्रांना पोलिसांनी अटक केली आहे.
कुजलेल्या मृतदेहशिवाय कोणताही ठोस पुरावा नसताना चोवीस तासाच्या आत आरोपींना अटक करण्यात यश मिळाल्याने शोध घेणाऱ्या पोलिसांना पोलीस अधीक्षक डॉ. प्रवीण मुंडे यांनी बक्षीस जाहीर केले आहे.