Jalgaon Crime : जळगाव (Jalgaon) जिल्ह्यातील चोपडा शहरात तब्बल 12 गावठी कट्टे आढळून आल्याने मोठी खळबळ उडाली असल्याचे पाहायला मिळत आहे. गावठी कट्ट्यांसह हरियाणाच्या दोघांना पोलिसांनी अटक केली आहे. गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर चोपडा शहर पोलिसांनी (Chopda City Police) ही मोठी कारवाई केल्याचं पाहायला मिळत आहे. अमितकुमार धनपत धानिया (वय 30 रा. भागवी ता. चरखी दादरी जि. भिवानी, हरियाणा) आणि शनेशकुमार रामचंदर तक्षक (वय 32 रा. भागवी ता.चरखी दादरी जि.भिवानी, हरियाणा) अशी दोन आरोपींची नावं आहे.


22 ऑगस्ट 2022 रोजी संध्याकाळी सव्वासहाच्या सुमारास चोपडा बस स्थानक परिसरात संशयित अमितकुमार धनपत धानिया आणि शनेशकुमार रामचंदर तक्षक यांच्याकडे 2 लाख 60 हजार रुपये किंमतीचे 12 गावठी बनावटीचे पिस्तुल (कट्टा) मॅग्झिनसह तसंच हजार रुपये किंमतीची पाच पिवळ्या धातूचे जिवंत काडतूस असून हे कोणाला तरी विकण्यासाठी आणल्याची गोपनीय माहिती चोपडा शहर पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी सापळा रचून दोघांना शिताफीने अटक केली. दोन्ही आरोपींवर भारतीय हत्यार कायदा कलम 3/25, 7/25 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या दोन आरोपींकडून तब्बल 12 गावठी बनावटीचे कट्टे, पाच जिंवत काडतूस आणि तीन मोबाईल फोन असा एकूण 2 लाख 77 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. 


चोपडा शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक अवतारसिंग चव्हाण, सहाय्यक पोलीस निरीक्षक अजित साळवे आणि संतोष चव्हाण यांनी घटनास्थळाला भेट दिली. पोलीस अधीक्षक डॉ. प्रविण मुंढे, अपर पोलीस अधीक्षक रमेश चोपडे, सहाय्यक पोलीस अधीक्षक कृषीकेश रावले यांच्या मार्गदर्शनाखाली आणि पोलीस निरीक्षक अवतारसिंग चव्हाण, पोलीस उपनिरीक्षक घनश्याम तांबे, पोलीस नाईक संतोष पारधी, संदीप भोई, किरण गाडीलोहार, प्रमोद पवार, प्रकाश मथुरे आदिंच्या पथकाने ही केली. गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक घनश्याम तांबे हे करत आहेत.


याआधी चोपडा पोलिसांकडून अवैध शस्त्र जप्त
दरम्यान, याआधी 17 ऑगस्ट रोजी अवैध शस्त्रांसंबंधी अशीच कारवाई करण्यात आली होती. त्यावेळी सहा गावठी कट्टे आणि 30 जिंवत काडतुसे जप्त करण्यात आली होती. त्यानंतर आता पुन्हा ही मोठी कारवाई करण्यात आल्याने खळबळ उडाली आहे. 17 ऑगस्ट रोजी रात्री साडेनऊच्या सुमारास चोपडा-शिरपूर रस्त्यावरील एस्सार कंपनीच्या पेट्रोल पंपाजवळ अवैद्य शस्त्र खरेदी-विक्री होणार असल्याची माहिती चोपडा पोलिसांना मिळाली. त्यानंतर पोलीस संबंधित ठिकाणी दाखल झाले आणि चार आरोपींना ताब्यात घेतलं. त्यांच्याकडून सहा गावठी बनावटीचे कट्टे, 30 जिवंत काडतूस, 4 मोबाईल फोन आणि फोर्ड एन्डेव्हर कंपनीचे चार चाकी वाहन असा एकूण 37,37000 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करत गुन्हा दाखल करण्यात आला.