Jalgaon News : जळगाव (Jalgaon) जिल्ह्यातील चोपडा शहर पोलिसांनी (Chopda City Police) धडक कारवाई करत सहा गावठी बनावटीचे कट्टे, 30 जिवंत काडतुसांसह जवळपास 38 लाखांचा ऐवज जप्त केला. या प्रकरणी भारतीय दंडविधान कलम 34 प्रमाणे आर्म्स अॅक्ट 3/25, 7/25 अंतर्गत सहा जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला. यामध्ये आतापर्यंत चार आरोपींना अटक करण्यात आली आहे. चोपडा शहर पोलिसांनी 17 ऑगस्ट रोजी रात्री साडेनऊच्या सुमारास ही कारवाई केली. आरोपी गावठी कट्टे आणि काडतुसे साताऱ्याला घेऊन जात होते.
पेट्रोल पंपाजवळ चार आरोपी अटकेत
17 ऑगस्ट रोजी रात्री साडेनऊच्या सुमारासा चोपडा-शिरपूर रस्त्यावरील एस्सार कंपनीच्या पेट्रोल पंपाजवळ अवैद्य शस्त्र खरेदी-विक्री होणार असल्याची माहिती चोपडा पोलिसांना मिळाली. त्यानंतर पोलीस संबंधित ठिकाणी दाखल झाले आणि चार आरोपींना ताब्यात घेतलं. त्यांच्याकडून सहा गावठी बनावटीचे कट्टे, 30 जिवंत काडतूस, 4 मोबाईल फोन आणि फोर्ड एन्डेव्हर कंपनीचे चार चाकी वाहन असा एकूण 37,37000 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करत गुन्हा दाखल करण्यात आला.
मुद्देमालाची किंमत
पोलिसांनी या प्रकरणात गणेश उर्फ सनी सुनिल शिंदे (वय 25 रा. ओगलेवाडी ता. कराड जि.सातारा), मोहसीन हनिफ मुजावर (वय 30 रा.युवराज पाटील चौक, मसुर ता.कराड जि. सातारा), रिजवान रज्जाक नदाफ (वय 23 रा. शिवाजी चौक, मलकापुर ता. कराड. जि. सातारा) आणि अक्षय दिलीप पाटील (वय 28 रा.45 रविवार पेठ, कराड जि.सातारा) अशी अठक करण्यात आलेल्या आरोपींची नावं आहे. या आरोपींनी अवैद्य शस्त्र खरेदी विक्री करणारा आरोपी सुरज विष्णु सांळुखे (रा.कराड जि.सातारा) याच्या सांगण्यावरुन आरोपी सागर सरदार (रा. पारउमर्टी ता.वरला जि.बडवानी) याच्याकडून मॅग्झीनसह सहा गावठी बनावटीच्या पिस्तुल (कट्टा), 30 पिवळ्या धातुंचे जिवंत काडतूस विकत घेतले. पोलिसांनी आरोपींच्या ताब्यातील 1,20,000 रुपये किंमतीचे 6 गावठी कट्टे, 30,000 रुपये किंमतीचे 30 जिंवत काडतूस, 87000 रुपये किमंतीचे 4 मोबाईल फोन आणि 35,00,000 रुपये किमंतीची फोर्ड एन्डेव्हर कपंनीच्या गाडीसह 37 लाख 37000 हजार रुपये किमंतीचा मुद्देमाल जप्त करण्यात केल.
सहा आरोपी हे संगनमताने गुन्हा करत असल्याने त्यांच्याविरोधात चोपडा शहर पोलीस स्टेशनमध्ये भादंवि कलम 34 प्रमाणे आर्म्स अॕक्ट 3/25, 7/25 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला. आतापर्यंत यापैकी चार आरोपींना अटक करण्यात आली आहे. तर दोघांचा शोध सुरु आहे.
ही कारवाई पोलीस अधीक्षक डॉ. प्रविण मुंढे, अप्पर पोलीस अधीक्षक रमेश चोपडे, सहाय्यक पोलीस अधीक्षक चोपडा विभाग कृषिकेश रावले यांच्या मार्गदर्शनाखाली आणि पोलीस निरीक्षक अवतारसिंग चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली पोलीस हवालदार दीपक विसावे, पोलीस नाईक संतोष पारधी, पोलीस नाईक संदीप भोई, पो शिपाई शुभम पाटील, पोलीस शिपाई प्रमोद पवार आणि पोलीस शिपाई प्रकाश मथूरे इत्यादींच्या पथकाने केली. पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक अजित सावळे हे करत आहेत.