Google Maps :  कुठल्याही अनोळखी ठिकाणी जायचं असेल तर अनेक जण गूगलं मॅप (Google Maps) या अॅपचा वापर करतात. गूगल मॅपवर आपलं लोकेशन आणि जिथे जायचंय तिथलं लोकेशन टाकलं की लगेच आपल्याला त्या ठिकाणी जायचा रस्ता, तसेच तिकडे जायला किती वेळ लागतो? या सर्व गोष्टींची माहिती मिळते. पण नुकताच गूगल मॅपचा वापर इटलीमधील (Italy) पोलिसांनी एका फरार असणाऱ्या माफियाला पकडायला केला आहे.


इटलीमधील पोलिसांनी गूगल मॅप या अॅपचा वापर करून जवळपास 20 वर्षांपासून फरार असणाऱ्या माफियाला अटक केली आहे, असे या घटनेचा तपास करणाऱ्यांनी बुधवारी सांगितलं. दोन वर्ष तपास केल्यानंतर 61 वर्षाच्या जिओआचिनो गॅमिनो या माफियाला स्पेनमधील गालापागर येथे पकडण्यात आले. तिथे तो बनावट नावाने राहात होता. हे शहर माद्रिदपासून जवळ आहे.


गूगल मॅप या अॅपवर असलेल्या एका फोटोमध्ये फळांच्या दूकानाच्या समोर उभा राहिलेला माणूस त्या माफियासारखा दिसत होता, त्यामुळे या माफियाला पकडण्यासाठी मदत मिळाली. 'गूगल मॅपवरील त्या फोटोमुळे आम्हाला तपासणी करणं सोप झालं त्या आधी आम्ही त्या माफियाचा शोध ट्रेडिशनल पद्धतीने घेत होतो.', अशी माहिती  इटालियन अँटी-माफिया पोलीस युनिट (DIA) चे उपसंचालक निकोला अल्टीरो यांनी दिली. 


गॅमिनो हा  स्टिड्डा नावाच्या सिसिलियन माफिया गटाचा सदस्य होता. तो 2002 मध्ये रोमच्या रेबिबिया तुरुंगातून पळून गेला होता.  2003 मध्ये अनेक वर्षांपूर्वी झालेल्या एका हत्येसाठी जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली होती. अल्टीरो म्हणाले की, 'गॅमिनो सध्या स्पेनमध्ये पोलिसांच्या ताब्यात आहे आणि त्याला फेब्रुवारीच्या अखेरीस इटलीला परत आणण्यात येणार आहे.'


महत्त्वाच्या बातम्या : 



LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha