Covid Vaccine : इथं लोक एकदा लस घ्यायला घाबरतात अन् बिहारमधील एका 84 वर्षीय आजोबांनी एक, दोन, तीन नव्हे तब्बल 11 वेळा लस घेतली आहे. ब्रह्मदेव मंडळ असे त्या वृद्ध व्यक्तीचे नाव आहे. त्यांच्या या दाव्याने बिहारमध्ये एकच खळबळ उडाली आहे. ब्रह्मदेव मंडळ हे बिहारमधील मधेपूरा जिल्ह्यातील ओराई येथील आहेत. ब्रह्मदेव मंडळ यांना लसीचा बारावा डोस घेताना पोलिसांनी अटक केली आहे. ब्रह्मदेव मंडल लसीकरणासाठी आधार कार्ड आणि मोबाईल क्रमांक देत होते, तरीही अशाप्रकारची घटना घडल्यामुळे आश्चर्य व्यक्त केले जात आहे. 


ब्रह्मदेव मंडल यांनी 13 फेब्रुवारी 2021 मध्ये पहिलांदा लसीचा डोस घेतला होता. त्यानंतर 11 महिन्यात वेगळवेगळ्या ठिकाणी त्यांनी 11 लसीचे डोस घेतले आहेत. हा दावा स्वत: मंडल यांनी केला आहे. लस घेतल्यानंतर गुडघेदुखी (Relief from knee pain) कमी झाल्याचे मंडल यांनी सांगितले. गुडघेदुखीतून कायमची सुटका मिळावी यासाठी वेगवेगळ्या ठिकाणांहून लसी घेतल्याचं मंडल यांनी पोलिसांना सांगितलं. एखाद्या व्यक्तीने 11 वेळा लस घेतल्यामुळे आश्चर्य व्यक्त केले जात आहे. 


ब्रह्मदेव मंडल यांनी लस घेतल्याच्या तारखाही कागदावर लिहून ठेवल्या आहेत. ब्रह्मदेव मंडल यांनी 13 फेब्रुवारी 2021 रोजी PHC मध्ये लसीचा पहिला डोस घेतला होता. त्यानंतर 13 मार्च रोजीही त्याच ठिकाणी लसीचा दुसरा डोस घेतला. लसीकरणाच्या कँपमध्ये ब्रह्मदेव मंडल यांनी सहा लसीचे डोस घेतले आहेत. 19 मे रोजी औराय येथील उप आरोग्य केंद्रात तिसरा लसीचा डोस घेतला. 16 जून रोजी भूपेंद्र भगत यांच्या येथे झालेल्या लसीकरण कँपमध्ये चौथा डोस घेतला. 24 जुलै, 31 ऑगस्ट, 11 स्पटेंबर, 22 सप्टेंबर आणि 24 स्पटेंबर रोजी त्यांनी लसीचे डोस घेतले. परबत्ता येथे ब्रह्मदेव मंडल यांनी दहावा लसीचा डोस घेतला. तर भागलपुर येथे लसीचा 11 वा डोस घेतल्याचा दावा ब्रह्मदेव मंडल यांनी केला आहे. ऑफलाईन कँपमध्ये अशाप्रकारच्या अनेक घटना घडू शकतात, असे नाव न छापण्याच्या अटीवर आरोग्य कर्मचाऱ्यांनी सांगितले. कारण, लसीकरणावेळी त्या व्यक्तीचा मोबाईल क्रमांक आणि आधार क्रमांक घेतला जातो, त्यानंतर ऑनलाइन सेव्ह करण्यात येते. 


मराठी लाईव्ह न्यूज सुपरफास्ट पाहा ABP Majha वर, मुंबई, पुणे, नागपूर, औरंगाबाद, मनोरंजन, क्रिकेट, देश-विदेशातील प्रत्येक बातमी सर्वात आधी एबीपी माझावर Live