It Raid: प्राप्तिकर विभागाने हॉटेल, संगमरवर, दिवे व्यापार आणि बांधकाम व्यवसायातील एका समूहाच्या दिल्ली आणि मुंबई येथील ठिकाणांवर 7 जुलै रोजी छापेमारी करून महत्वाची कागदपत्रे जप्त केली. दिल्ली, मुंबई आणि दमन येथील एकूण 18 ठिकाणांवर छापे टाकण्यात आले.


या ठिकाणी घेण्यात आलेल्या शोध मोहिमेत, अनेक महत्वाचे कागदोपत्री आणि डिजिटल स्वरूपातील पुरावे गोळा करण्यात आले. या पुराव्यातून असे दिसून येते की, या समूहाने बेहिशेबी पैसा काही कमी कर असलेल्या देशांत लपवून ठेवला होता. या समूहाने मलेशियातील कंपन्यांच्या जाळ्यामार्फत शेवटी हा पैसा त्यांच्या भारतातील हॉटेल व्यवसायात गुंतवला होता. अशा प्रकारे गुंतवलेली रक्कम 40 कोटी रुपयापेक्षा जास्त आहे.


या प्रकरणी जमा करण्यात आलेल्या पुराव्यांवरून असे दिसून येते की, या समूहाने परदेशातील काही कंपन्यामध्ये गुंतवणूक केली ज्याद्वारे विशेषत्वाने कमोडीटी ट्रेडिंग करण्यात आले. संबंधित आर्थिक वर्षासाठीच्या प्राप्तिकर विवरणात आपल्या एका कंपनीची निव्वळ किंमत या समूहाने लपविली होती. तपासात असेही आढळून आले की, या समूहाच्या प्रवर्तकाने परदेशात स्थावर मालमत्ता खरेदी केली होती. जी त्यांच्या प्राप्तिकर विवरणात दाखविण्यात आली नव्हती. या शिवाय परदेशात कमोडीटी ट्रेडिंगसाठी काही कंपन्या स्थापन करण्यात आल्या असल्याचे आढळून आले. या कंपन्यांबद्दल देखील माहिती देण्यात आली नव्हती.


तपासात असेही आढळून आले की समूहाने भारतात रोखीने व्यवहार केले आहेत. ज्याचा हिशोब ठेवण्यात आला नव्हता. समूहाच्या संगमरवर आणि दिव्यांच्या व्यापारविषयी जप्त करण्यात आलेल्या पुराव्यांवरून असे दिसून येते की एकूण विक्रीच्या 50% ते 70% विक्री बेहिशोबी रोखीने करण्यात आली आहे. या शोध मोहिमेत बेहिशोबी 30 कोटी रुपयांचा विकला न गेलेला माल देखील आढळून आला. या समूहाच्या हॉटेल व्यवसायात, विशेषतः बँक्वेट विभागात, बेहिशोबी विक्री केल्याचे आढळून आले. आतापर्यंत, 2.5 कोटी रुपयांचे बेहिशोबी दागिने जप्त करण्यात आले आहेत. पुढील तपास सुरु आहे.