बीड : बीडमध्ये  सोयाबीनच्या उभ्या पिकावर गोगलगायींनी असा काही हल्ला चढवलाय की शेतातील उभे पिके नष्ट होण्याच्या मार्गावर आहेत. बीड जिल्ह्यात केवळ सोयाबीनच नाही तर भाजीपाला पिकावर सुद्धा गोगलगायींनी हल्ला चढवला आहे. 


उदंड वडगावच्या जीवन चव्हाण यांनी तीस हजार रुपये खर्च करून पाच एकरवर सोयाबीनची पेरणी केली. उगवलेलं सगळं सोयाबीन  गोगलगायींनी फस्त केलं आणि म्हणून पुन्हा एकदा त्यांनी दुबार पेरणी केली. मात्र त्याचा काहीच उपयोग झाला नाही आताही त्यांच्या शेतात गोगलगायी सोयाबीनचे पीक फस्त करत आहेत. फक्त सोयाबीन नाहीतर भाजीपाला पिकावर देखील या गोगलगायीचा प्रादुर्भाव जाणवू लागला आहे.  याच गावच्या दत्ता जाधव यांनी सात एकरावर मिरचीची लागवड केली. मात्र मोठ्या प्रमाणात गोगलगाय मिरचीचे शेंडे खाऊ लागल्याने संपूर्ण मिरचीचा प्लॉटच धोक्यात आला आहे.  यावर उपाययोजना म्हणून त्यांनी महागडे औषध देखील फवारले मात्र याचा काहीच उपयोग झाला नाही. त्यामुळे आता उत्पन्नाची अपेक्षा सोडाच केलेला खर्च देखील निघेल का नाही असा प्रश्न त्यांना पडला आहे. 


यावर्षी अपेक्षित पाऊस झाल्याने मोठ्या प्रमाणात बीड जिल्ह्यात सोयाबीनची पेरणी झाली आहे आणि यातून चांगले उत्पादन मिळेल अशी अपेक्षा शेतकऱ्यांना आहे.  मात्र सध्या सुरू असलेल्या संतधार पावसामुळे अतिवृष्टीमुळे नुकसान होण्याची भीती शेतकऱ्यांमध्ये आहे तर दुसरीकडे पहिल्यांदाच गोगलगायीचा प्रादुर्भाव सोयाबीनवर होऊ लागल्याने शेतकऱ्यांसमोर आता नवीन संकट उभा राहिलय. नियमित पडणाऱ्या रोगावर शेतकरी वेगवेगळ्या औषधांची फवारणी करून त्यावर उपाययोजना करतात.  मात्र गोगलगायींचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सध्या तरी शेतकऱ्यांकडे काहीच उपायोजना नसल्याचं शेतकरी सांगत आहेत. 


गोगलगायींचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शेतकऱ्यांनी विद्यापीठाने शिफारस केलेल्या औषधांचा वापर करावा आणि याची माहिती कृषी विभागाला द्यावी.  त्यासाठी हेक्टरी 750 रुपयांचा अनुदान या शेतकऱ्यांना दिला जाणार आहे. याचा प्रादुर्भाव इतर जिल्ह्यातून बीड जिल्ह्यात झाला असल्याची शक्यता कृषी विभागाने वर्तवली आहे.  या गोगलगायींच्या प्रादुर्भावामुळे उत्पन्नावर जास्त परिणाम होणार नसल्याचेही सांगण्यात आले आहे. 


बीडच्या जिल्हा प्रशासनाने या गोगलगायींपासून बंदोबस्त करण्यासाठी शेतकऱ्यांना हेक्टरी 750 रुपयांचा अनुदान जाहीर केले आहे. मात्र जिथे शेतामध्ये पिकाचे सांगाडे सुद्धा दाखवायला शेतकऱ्याकडे शिल्लक नाही तिथे हे साडेसातशे रुपये घेऊन करायचे काय असा सवाल शेतकऱ्यांसमोर आहे.