छत्रपती संभाजीनगर : लग्न ही प्रत्येक समाजात, धर्मात आणि कुटुंबातील आनंदी क्षण असतो. मात्र, कधी-कधी लग्न हेच दोन कुटुंबातील रक्तरंजीत इतिहास बनून जातो. समाजाच्या खोलवर रुजलेली जातीव्यवस्था अशा घटनांना जन्म देते, त्यातूनच लग्नसोहळा (Marriage) हा विघ्नसोहळा बनतो. सैराट चित्रपटात दिग्दर्शक नागराज मंजुळेने अशाच जातीव्यवस्थेवर प्रहार केला होता. ऑनर किलिंगवर प्रकाश टाकत एका कुटुंबातील धक्कादायक कथा साकारली होती. मात्र, तशीच घटना छत्रपती संभाजीनगरमध्ये (Sambhajinagar) घडली आहे. मुलीने आंतरधर्मीय विवाह केल्याच्या रागातून आपल्याच जावयाला सासऱ्याने आणि मेव्हण्याने संपवल्याची संतापजनक घटना समोर आली आहे. माणुसकीला काळीमा फासणाऱ्या या घटनेनं संभाजीनगर हादरलं असून मृत अमितच्या नातेवाईकांनी त्याचा मृतदेहच पोलीस (Police) ठाण्यात नेऊन ठेवला होता.
जात जात नाही, समाज ऊन्नत होत नाही, नीती,मती,गती जाते पण जात जात नाही, असं म्हटलं जातं. या वाक्याचा प्रत्ययच आज छत्रपती संभाजीनगरमधील घटनेनं आला म्हटलं तर वावगं ठरणार नाही. कारण, अवघ्या 25 वर्षांच्या अमितला त्याच्या सासऱ्याने व मेव्हुण्याने चाकूचे वार करुन संपवल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. गेल्या 12 दिवसांपासून मृत्युशी झुंज देत असलेल्या अमितने आज अखेरचा श्वास घेतला. प्रेमविवाहाची एवढी मोठी शिक्षा अमितला मिळाली, त्याचा समाजातून संतापही व्यक्त होत आहे. मात्र, अद्यापही समाजाच्या मानसिकतेतून जात जात नाही हेही तितकंच खरं आहे. याप्रकरणी पोलिसांनी हत्येचा गुन्हा दाखल केला असून आरोपींचा शोध सुरू आहे.
नवीन कायद्यानुसार, 14 जुलै रोजी हत्येचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल झाला होता. पण, मृत्यू काल झाल्यामुळे हत्येच्या गुन्ह्याची कलमं लावून घेतली आहेत. याप्रकरणी 2 आरोपी असून त्यांच्या मागावर पोलिसांची 2 पथके कार्यरत आहेत. आम्ही लवकरात लवकर आरोपींना अटक करू, असे डीसीपी नवनीत कावत यांनी म्हटले. तसेच, या दोघांचं इंटरकास्ट लग्न झालेलं होतं, त्यातून त्यांचे कौटुंबिक मतभेद निर्माण झाले होते. या वादातूनच ही हत्या झाल्याचंही कावत यांनी एबीपी माझाशी बोलताना सांगितले.
अमितचे तिच्या बालपणीची मैत्रिण विद्यासोबत प्रेमसंबंध होते. मात्र, दोघांचा धर्म वेगळा असल्याने कुटुंबीयांचा त्यांच्या प्रेमाला विरोध होता. पण, घरच्यांचा विरोध पत्करून एप्रिल महिन्यात दोघांनी पळून जाऊन लग्न केले. पुढे अमितच्या कुटुंबीयांनी दोघांना स्वीकारल्याने 2 मे रोजी ते घरी परतले. मात्र, विद्याच्या कुटुंबातील सदस्यांनी दोघांनाही स्वीकारले नव्हते. तर, याउलट विद्याचे वडील आणि चुलत भाऊ अमितला जीवे मारण्याची धमकी देत होते. त्यातूनच, शहरातील इंदिरानगरमध्ये 14 जुलै रोजी अमितवर जीवघेणा हल्ला झाला. या घटनेत अमित मुरलीधर साळुंके हा तरुण गंभीर जखमी झाला होता. पोटात व छातीत खोलवर वार झाल्याने गुरुवारी घाटीच्या अतिदक्षता विभागात अमितचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.
12 दिवस मृत्यूशी झुंज
आपल्या मुलीसोबत पळून जाऊन लग्न केल्याचा राग विद्याच्या वडिलांना व चुलता भावाच्या डोक्यात होता. याच रागातून विद्याचे वडील आणि तिच्या चुलत भावाने 14 जुलै रोजी अमितवर जीवघेणा हल्ला केला. या हल्ल्यात अमित खाली कोसळला, त्याच्या पोटात खोलवर वार घुसल्यामुळे तेव्हापासूनच त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू होते.मात्र, 12 दिवसानंतर अमितशी मृत्यूशी सुरू असलेली झुंज गुरुवारी उपचारादरम्यान अमितचा मृत्यू झाला. या प्रकरणी पोलिसात गुन्हा देखील दाखल करण्यात आला. या ऑनर किलिंग च्या घटनेने संभाजीनगरशहर हादरून गेलं आहे. दरम्यान, याप्रकरणातील आरोपी वडील गीताराम किर्तीशाही आणि मुलीचा चुलत भाऊ आप्पासाहेब किर्तीशाही हे दोघेही सध्या फरार असून पोलिसांकडून आरोपींचा शोध घेण्यात येतआहे.
हेही वाचा
बीड पे चर्चा... शरद पवारांसोबत बजरंग सोनवणे 'हवेत'; म्हणाले, जिल्ह्याची खडान खडा माहिती