लातूर : महाराष्ट्र सरकारने राज्यात गुटखा बंदी केली असून गुटखा विक्री व उत्पादनास प्रतिबंध लावण्यात आले आहेत. मात्र, अद्यापही राजरोजसपणे गुटखा विक्री होते, अन्न व औषध विभागातील अधिकारी आणि पोलिसांकडून काही ठिकाणी कारवाई केली जाते. मात्र, अनेकदा पोलिसांची ही कारवाई तोंडदेखलेपणाचीच असल्याचे दिसून येते. मात्र, आता लातूर (Latur) एमआयडीसीमध्ये गुटखा बनवण्याच्या कारखान्यावर पोलिसांनी धाड टाकून मोठी कारवाई केली आहे. याठिकाणी मोठं साहित्य जप्त केलं आहे. अतिरिक्त एमआयडीसी लातूर या भागातील एका गोदामामध्ये गोवा गुटखा बनवण्याचा कारखाना उघड करण्यात पोलिसांना यश आलं आहे. या ठिकाणी गोवा गुटखा बनवण्याचे यंत्र, इतर कच्चा माल आणि वाहने असा एकूण तीन कोटीचा मुद्देमाल पोलिसांनी (Police) हस्तगत केला आहे. याप्रकरणी लातूर पोलिसांनी 7 जणांविरोधात गुन्हा (Crime News) दाखल केला आहे.
लातूर येथील अतिरिक्त एमआयडीसी भागात धनंजय कोंबडे यांच्या कोंबडे ऍग्रो वेअर हाऊसमध्ये गोवा गुटखा बनवण्याचं काम सुरू असल्याची माहिती पोलिसांना गुप्त बातमीदारामार्फत मिळाली. त्यानुसार लातूर पोलिसांनी या ठिकाणी छापा टाकून कारवाई केली. या ठिकाणी गोवा गुटखा बनवण्यासाठी लागणारा कच्चामाल... सुगंधी तंबाखू ...रसायने... सुपारी आणि यंत्र आढळून आली. या ठिकाणी परराज्यातून आलेले काहीजण पोलिसांनी ताब्यात घेतले आहेत. तसेच लातूर जिल्ह्यातील चाकूर भागातील एका व्यक्तीलाही पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. अंकुश रामकिशन कदम, हसना कुमार उराम (बिहार), गोपाळ मेगवाल (राजस्थान), धनंजय गहिनीनाथ कोंबडे, पारस वालचंद पोकरणा, राम केंद्रे आणि विजय केंद्रे अशी आरोपीची नावे आहेत.
पोलीस अधीक्षक सोमय मुंडे यांचे मार्गदर्शनात लातूर पोलीस दलाकडून अवैद्य धंद्याविरुद्ध लातूर शहर आणि जिल्ह्यात कडक मोहीम राबविण्यात येत आहे. अवैद्य धंद्याविरुद्ध राबविण्यात येत असलेल्या कडक कारवाईचाच भाग म्हणून सहाय्यक पोलीस अधीक्षक बी. चंद्रकांत रेड्डी उपविभागीय पोलीस आधिकारी, चाकूर यांच्या पथकाला अतिरिक्त एमआयडीसी लातूर येथे अवैद्यरीत्या बनावट गुटखा बनविण्याचा कारखाना चालू असल्याची माहिती मिळाली होती. त्यानंतर, पोलिसांनी घटनास्थळी धाड टाकत ही कारवाई केली आहे. दरम्यान, याप्रकरणी लातूर पोलीस पुढील तपास करत आहेत.