सांगली : सांगली जिल्ह्यातील दुधगावमध्ये माहेरला असलेल्या महिलेचा कर्नाटकातील महालिंगपूरमध्ये गर्भपात केल्याने मृत्यू झाला. सोनाली सतीश कदम असे मयत महिलेचे नाव आहे. मयत सोनालीचे पती भारतीय सैन्य दलात कार्यरत आहे. सोनाली कदम यांना यापूर्वी दोन मुली आहेत. काही दिवसापूर्वी कोल्हापूर जिल्ह्यातील जयसिंगपूरमध्ये सोनोग्राफी केली होती. यावेळी त्यांना तिसरी देखील मुलगीच असल्याचे सांगण्यात आलं. त्यानंतर महालिंगपूरमध्ये एका डॉक्टर महिलेकडे गर्भपात केला होता. यानंतर तिचा मृत्यू झाला होता.


मात्र, डॉक्टरने मृत्यू प्रमाणपत्र न दिल्याने सोनाली कदमचा भाऊ, तिची आई आणि बोगस डॉक्टर असे तिघे सोनाली कदम आणि मृत अर्भकाचा मृतदेह घेऊन सांगलीत मयत प्रमाणपत्र मिळतं का हे पाहण्यासाठी घेऊन फिरत असताना पोलिसांनी अटक केली होती. दरम्यान, सैन्यात असलेल्या पतीवर अजून कोणतीही कारवाई करण्यात आलेली नाही.   


बोगस महिला डॉक्टरला पोलिसांकडून अटक


सोनाली कदमचा महालिंगपूरमध्ये ज्या ठिकाणी गर्भपात केला तिथं सांगली पोलीस आणि कर्नाटक, आंध्र पोलिसांनी छापा टाकला. यावेळी कविता बडणेवर नामक बोगस महिला डॉक्टरला पोलिसांनी अटक केली. कविताने डॉक्टर नसताना सोनालीचा गर्भपात केल्याने मृत्यू झाला होता. कर्नाटक पोलीस पुढील तपास करीत आहेत. शिवाय गर्भलिंगनिदान चाचणी जयसिंगपूरमधील ज्या रुग्णालयात करण्यात आली, तेथील एक वैद्यकीय अधिकारी आणि प्रत्यक्ष महालिंगपूरमध्ये गर्भपात शस्त्रक्रियेत सहभागी असणारे दोन वैद्यकीय अधिकाऱ्यांवर सांगली पोलिसांकडे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 


गर्भलिंग निदान चाचणी जयसिंगपुरात


दरम्यान, सोनालीची काही दिवसांपूर्वी जयसिंगपूरमध्ये एका रुग्णालयात गर्भलिंग निदान चाचणी करण्यात आली होती. महालिंगपूरमध्ये एका रुग्णालयात तिचा गर्भपात करताना मृत्यू झाला. त्यामुळे नातेवाईकांना धक्का बसला. त्यांनी सोनालीला अंत्यसंस्कारासाठी सासरी नेण्याची तयारी केली. परंतु, डॉक्टरने मृत्यूचा दाखला देण्यास नकार दिला. सोनालीच्या मृत्यूची बातमी सर्वत्र पसरू नये, म्हणून तातडीने अंत्यसंस्कार करणे गरजेचे होते. परंतु, मृत्यूचा दाखला मिळवायचा कसा? यासाठी तिचा मृतदेह कारमधून सांगलीत आणण्यात आला.  कोणता डॉक्टर मृत्यूचा दाखला देईल म्हणून ते चौकशी करत फिरत होते. कारमध्येच सोनालीचा मृतदेह होता. दाखला मिळण्यासाठी फिरत असलेल्या सोनालीचे नातेवाईक आणि एक वैद्यकीय अधिकाऱ्याला बसस्थानक परिसरात पोलिसांनी ताब्यात घेतले होते. 


इतर महत्वाच्या बातम्या