Gujarat Crime News: 'तुझं माझं जमेना, तुझ्या वाचून करमेना' ही म्हण आपण सर्वांनीच ऐकली आहे. पण आता या म्हणीला साजेसंच एक प्रकरण समोर आलं आहे. गुजरातमधील एक विचित्र प्रकरण सध्या चर्चेत आलं आहे. एका महिलेनं 10 वर्षांत तिच्या पतीची एकदा नाही, दोनदा नाही, तर तब्बल 7 वेळा तक्रार केली होती, त्यानंतर पतीला अटकही करण्यात आली होती. एवढंच नाहीतर 7 वेळा पतीला पोलिसांनी अटक करुन नेल्यानंतर तिनंच त्याला सोडवूनही आणल्याची माहिती मिळत आहे. 


गुजरातमधील मेहसाणमधील कादी येथे राहणाऱ्या एका महिलेनं आपल्या पतीला 10 वर्षांत सात वेळा घरगुती हिंसाचाराचे आरोप करत तुरुंगात डांबलं आणि त्यानंतर सातही वेळा त्याला तुरुंगातून सोडवूनही आणलं. या प्रकरणातील आश्चर्याची बाब म्हणजे, पतीला अटक झाल्यानंतर काही महिन्यांतच पत्नी जामीन करायची आणि त्याला घरी घेऊन यायची. हे पती-पत्नी एकत्र राहायचे, भांडायचे, आरोप-प्रत्यारोप करायचे, वेगळे व्हायचे आणि पुन्हा एकत्र व्हायचे. या प्रकरणानं गुजरात पोलिसांना चक्रावूनच सोडलं होतं. 


आधी सर्वकाही ठीक, मात्र नंतर... 


पती-पत्नीच्या भांडणाचा हा पॅटर्न तब्बल 10 वर्ष सुरू होता. दोघंही एकमेकांसोबत राहू शकत नव्हते, आणि एकमेकांपासून दूरही राहू शकत नव्हते. पण आधीपासून त्यांच्यात वाद नव्हते. आधी दोघांमध्ये सर्वकाही आलबेल होतं. दोघंही गुण्यागोविंदानं एकमेकांसोबत राहत होते. 


दोघांच्या सुखी संसाराला सुरुवात झाली 2001 मध्ये. पाटणचा रहिवाशी असणआऱ्या प्रेमचंद मालीनं मेहसाणच्या सोनू मालीसोबत आपली लग्नगाठ बांधली. दोघेही लग्नानंतर कादी येथे स्थायिक झाले. दोघांचाही राजा-राणीचा संसार सुरू होता. पण दोघांच्या सुखी संसाराला कोणाची तरी नजर लागली. 2014 मध्ये दोघांमध्ये खटके उडण्यास सुरुवात झाली. याची सुरुवात दोघांमघील मतभेदानं झाली. त्यानंतर सोनूनं पती प्रेमचंद विरोधात सर्वात आधी 2015 मध्ये घरगुती हिंसाचाराचा गुन्हा दाखल केला. त्यावेळी न्यायालयानं प्रेमचंदला दरमहा 2 हजार रुपये पोटगी देण्याचे निर्देश दिले. 


प्रेमचंदला पोटगी देणं शक्य होईना


प्रेमचंद रोजंदारीवर काम करायचा, त्याचं हातावरचं पोट होतं. 2015 मध्ये प्रेमचंदला पोटगी देण्यासाठी खूप संघर्ष करावा लागला. न्यायालयानं निर्देश देऊनही तो सोनूला पैसे देऊ शकला नाही. त्यानंतर पुन्हा त्याच्याविरुद्ध अटक वॉरंट जारी करण्यात आलं आणि  त्याला पुन्हा पोलिसांनी अटक केली. त्यानंतर प्रेमचंद यांनी पाच महिने तुरुंगात काढले. यानंतर सोनूनं त्याचा जामीन करत त्याला तुरुंगातून सोडवलं. कायदेशीररित्या विभक्त होऊनही हे जोडपं पुन्हा गुण्यागोविंदानं एकत्र राहू लागलं. पण दोघांमध्ये काही दिवसांतच पुन्हा खटके उडू लागले. 


पत्नीची तक्रार, पतीला अटक अन् पत्नीच्या मदतीनं पतीची पुन्हा सुटका 


मिळालेल्या माहितीनुसार, सोनूनं प्रेमचंदला 2016 ते 2018 या कालावधीत अनेकदा पती प्रेमचंदला घरगुती हिंसाचार केल्याप्रकरणी अटक केली आणि प्रत्येक वेळी त्याला जामीन मिळाला. 2019 आणि 2020 मध्ये, प्रेमचंदनं दोनदा पोटगी भरली नाही, त्यानंतर त्याला दोनदा तुरुंगात पाठवलं. यानंतर सोनूनं पुन्हा एकदा त्याची तुरुंगातून सुटका केली आणि पुन्हा दोघेही एकत्र राहू लागले. सोनूलाही भांडणाची सवय झाली होती. 2023 च्या सुरुवातीला वाटत होतं की, सर्व काही ठीक होईल. दोघं कादीच्या घरात एकत्र राहू लागले पण त्यानंतर परिस्थिती आणखी बिघडली. प्रेमचंद पोटगी देणं जवळपास बंदच केलं. त्यानंतर सोनूनं त्याला पुन्हा एकदा तुरुंगात टाकलं. 4 जुलै रोजी पुन्हा एकदा सोनूनं जामीन राहून त्याला सोडवून कादीच्या घरी आणलं. 


अखेर पतीकडून गुन्हा दाखल 


5 जुलै रोजी प्रेमचंदची पर्स आणि फोन गायब झाला. याबाबत त्यानं सोनूला विचारणा केली. सोनूनं त्याची पर्स कुठे आहे? हे माहित नसल्याचं त्याला सांगितलं. यावरून दोघांमध्ये वाद सुरू झाला. यानंतर हे प्रकरण हाणामारीपर्यंत गेलं. दोघांनीही एकमेकांना मारहाण केली. त्यांचा 20 वर्षांचा मुलगा रवीही त्यात सामील झाला. त्यानं प्रेमचंद यांच्यावर बॅटनं हल्ला केला.


सोनूनं प्रेमचंदच्या डोळ्यात लाल तिखट टाकलं


यानंतर प्रेमचंदनं कादी पोलिसांत एफआयआर दाखल केला. सोनूनं डोळ्यात तिखट फेकल्याचंही त्यानं तक्रारीत म्हटलं. यानंतर तो दु:खी होऊन घर सोडून पाटण येथे आईकडे राहायला गेला. पीडित प्रेमचंदनं सोनू आणि त्याच्या मुलाविरुद्ध मारहाण केल्याचा आरोप करत तक्रार दाखल केली. सध्या पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत.