सांगली : महाराष्ट्रामधील (Maharashtra) भ्रूणहत्येसारख्या संवेदनशील प्रकरणात  शासकीय असंवेदनशीलतेने कळस गाठला असल्याचं समोर आले आहे. कारण पाच वर्षांपूर्वी घडलेल्या एका भ्रूणहत्या प्रकरणात अद्याप विशेष सरकारी वकील नियुक्त केला गेलेला नाही. त्यामुळे न्यायालयीन कामकाजही सुरू होऊ शकलेले नाही. मिरज तालुक्यातील म्हैसाळमध्ये 2017 साली हे भ्रूणहत्याचे प्रकरण उघडकीस आले होते. यात एका ओढ्यात 19 अर्भकाचे अवशेष प्लास्टिकच्या पिशव्यात सापडले होते. 


या प्रकरणी डॉ बाबासाहेब खिद्रापूरेला अटक झाली होती. पुढे त्याची जामिनीवर सुटका देखील झाली. मात्र या कालावधीत केवळ शासकीय उदासीनतेमुळे भ्रूणहत्येसारख्या संवेदनशील विषय केवळ वकील न मिळाल्याने न्यायालयात उभा राहू शकला नाही. 2017 मध्ये तासगाव तालुक्यातील मणेराजुरी मधील स्वाती जमदाडे या विवाहितेचा गर्भपातावेळी मृत्यू झाल्यानंतर डॉ.खिद्रापूरेचे भ्रूणहत्याचे रॅकेट उघडकीस आले होते. यात एका ओढ्यात 19 अर्भकाचे अवशेष प्लास्टिकच्या पिशव्यात सापडले होते.


पाच वर्षापूर्वी म्हणजे फेब्रुवारी 2017 मध्ये भ्रूणहत्येचे मोठे रॅकेट मिरज तालुक्यातील मैसाळ मध्ये उघडकीस आलं होतं. या प्रकाराने राज्यात खळबळ उडाली होती. मिरज तालुक्यातील म्हैसाळ मधील डॉ बाबासाहेब  खिद्रापूरे याच्या हॉस्पिटलमध्ये अवैधरीत्या गर्भपात केले जात असल्याचे एका विवाहितेचा गर्भपातावेळी मृत्यू झाल्यानंतर समोर आले होते. 


यानंतर पोलिसांनी हॉस्पिटल वर छापा  देखील टाकला होता. यावेळी  हॉस्पिटल जवळच असलेल्या एका ओढ्यामध्ये 19 अर्भकांचे अवशेष प्लास्टिकच्या पिशवीत सापडले होते. यानंतर राज्य महिला आयोगापासून ते केंद्रीय  समितीनेही याप्रकरणी चौकशी केली होती. तसेच या बेकायदा गर्भपात आणि भरून हत्या प्रकरणाचा अंतिम अहवाल शासकीय रुग्णालयाच्या तत्कालीन अधिष्ठाता डॉक्टर पल्लवी सापळे यांच्या अध्यक्षतेखालील चौकशी समितीने राज्य शासनाला सप्टेंबर 2017 मध्ये सादर केला होता. 


तसेच राज्य महिला आयोगाच्या तत्कालीन अध्यक्षा विजया रहाटकर यांनी म्हैसाळ येथील हॉस्पिटलला भेट देऊन या प्रकरणाच्या चौकशीचे आदेश दिले होते. तसेच तत्कालीन महिला व बालकल्याण मंत्री पंकजा मुंडे यांच्यासह विविध मंत्र्यांनी या भ्रूणहत्या प्रकरणाची कठोर चौकशीची मागणी करत या प्रकरणात तातडीने विशेष सरकारी वकील निर्णयाची घोषणा केली होती. मात्र भ्रूणहत्येसारख्या संवेदनशील विषयात देखील सर्वाच्याच असंवेदनशीलतेचा कळस  दिसून आला आहे. 


हे प्रकरण शांत झाल्यानंतर तत्कालीन सत्ताधारी भाजप आणि आत्ताच्या महाविकास आघाडी सरकारने या प्रकरणी कोणतीही ठोस पावले उचलली नाहीत. शिवाय या प्रकरणी आंदोलन करून राज्यभर या प्रकरणाचा गाजावाजा करणारे राजकीय पक्ष नेते विविध सामाजिक संघटना यांनीही या प्रकरणाचा पाठपुरावा सोडून दिला. 


गर्भपात मध्यरात्री विल्हेवाट पहाटे !
डॉ. बाबासाहेब खिद्रापुरे महिलांचे गर्भपात मध्यरात्री करायचा आणि पहाटे गाव झोपेत असताना एका दूध विक्रेत्याची मदत घेऊन गावाजवळील एका ओढयात त्याची विल्हेवाट लावायचा, अशी माहिती पोलीस तपासात पुढे आली होती.  


त्यावेळी पंकजा मुंडे म्हणाल्या होत्या...
तत्कालीन महिला व बालविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी सांगितलं होतं की, म्हैसाळमधील गर्भपाताची घटना  भविष्यातील गर्भपाताच्या घटना रोखण्यासाठी मह्त्वाची ठरेल. जिल्ह्यात ज्या पॅटर्नने या घटनेची चौकशी केली जातेय तशीच चौकशी प्रत्येक जिल्ह्यात केली जाणार असल्याचे मत पंकजा मुंडे यांनी सांगितलं होतं. 


त्यावेळी विजया रहाटकर म्हणाल्या होत्या...


म्हैसाळमधील हॉस्पिटलमध्ये गर्भपात होत असल्याचा प्रकार उजेडात आल्यानंतर आरोग्य विभागाच्या यंत्रणा आता सक्षम आणि बळकट करण्याची  गरज असल्याचे मत तत्कालीन महिला आयोगाच्या अध्यक्षा विजया रहाटकर यांनी वक्त केलं  होतं. तसंच लोकांच्या मानसिकतेत देखील बदल करण्याची मोठी गरज असून त्यासाठी आता प्रयत्न केले जातील, असे त्या म्हणाल्या होत्या. दवाखान्याची चौकशी करणाऱ्या अधिकाऱ्याची पुन्हा चौकशी करणार असून संबंधीत प्रकरणात हलगर्जी करणाऱ्या वर कारवाईचे  आदेश दिले असल्याचे त्यांनी त्यावेळी सांगितले होते.