Nanded News : आपल्या दिव्यांगपणावर मात करून आणि आर्थिक परिस्थिती हलाखीची असूनही नांदेडच्या लता उमरेकर (Lata Umarekar)या तरुणीने आंतराष्ट्रीय स्तरावर बॅडमिंटन स्पर्धेत उत्तम खेळ करत आजपर्यंत पाच सुवर्ण पदकांची कामगिरी केली आहे. हमाली करुन परमेश्वर उमरेकर यांनी आपल्या दोन मुलांना चांगलं खेळाडू बनवलं. लता उमरेकरला पॅरा बॅडमिंटन तर दिनेशला धनुर्विद्यामध्ये राष्ट्रीय खेळाडू बनवत आपली मुलं जागतिक स्तरावर खेळावी असं स्वप्न उराशी बाळगलं. 


उमरेकर यांच्या तीन अपत्यापैकी दुसरं अपत्य असणारी लता ही जन्मतःच विकलांग आहे. ज्यात तिची उंची तीन फुटांपेक्षा जास्त होऊ शकली नाही. या शारीरिक व्याधीवर मात करत लताने आतापर्यंत पाच सुवर्णपदकं जिंकत राष्ट्रीय स्तरावर उत्तम कामगिरी केलीय. नांदेड जिल्ह्यात आतापर्यंत पॅरा बॅडमिंटन खेळात आंतरराष्ट्रीय स्तरावर सुवर्ण कामगिरी करणारी ती एकमेव खेळाडू आहे. 


एवढी उत्तम कामगिरी करूनही जिल्हा क्रीडा विभागाच्या व प्रशासनाच्या उदासीनतेमुळे यावर्षी होणाऱ्या एशियन गेम्समध्ये आपला सहभाग नोंदवण्यासाठी एकटी धडपड करतेय. लताला आता स्पेन आणि दुबई इथे होणाऱ्या आंतरराष्ट्रीय स्पर्धेत खेळण्यासाठी ये-जा करायला आर्थिक विवंचनेचा सामना करावा लागतोय. 


समाजातील दानशूर मंडळींनी पुढे येऊन जागतिक स्तरावर स्पर्धेत खेळण्यासाठी जाण्याकरिता मदत करावी असे आवाहन लताने केलंय. नांदेड शहरातील दत्तनगर भागांत छोट्याश्या घरात आईवडिलांसह लता राहते. स्वतः उंचीने कमी असलेल्या लताची कीर्ती मात्र देशभर पसरलेली आहे. 


लता ही बॅडमिंटन स्पर्धेची आंतराष्ट्रीय खेळाडू आहे, तिने आजवर  देशभर झालेल्या बॅडमिंटन स्पर्धेत, सुवर्ण, कांस्य अशी विविध पाच पदके जिंकली आहेत. लताचे आईवडील आणि भाऊ हे मोलमजुरी करत कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात. आर्थिक परिस्थिती बेताची असतानाही लताने बॅडमिंटन खेळासाठी घेतलेली मेहनत कौतुकास्पद अशीच आहे. याच लताला आता आंतरराष्ट्रीय बॅडमिंटन स्पर्धेसाठी स्पेन आणि दुबईला निमंत्रित करण्यात आलंय. 


मात्र या दोन्ही ठिकाणी जाण्यासाठी आंतरराष्ट्रीय प्रवास खर्च लताला परवडणारा नाही, त्यामुळे लता हताश झालीय.आंतरराष्ट्रीय स्पर्धेसाठी या दोन्ही देशात जाण्यासाठी लताला जवळपास साडेतीन लाख रुपयांचा खर्च लागणार आहे. मात्र तिच्या कुटुंबाची हा खर्च करण्याची ऐपत नाही. समाजातील दानशूर मंडळींनी प्रवासखर्च भागवला तर आंतरराष्ट्रीय स्पर्धेत आपल्या देशाचे नाव उज्वल करण्याचा विश्वास लताने व्यक्त केलाय.



LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha