गोंदिया: एका नराधम शिक्षकानेच अल्पवयीन विद्यार्थिनीवर अत्याचार केल्याची घटना गोंदियात घडली आहे. पोलिसांनी या नराधमाला बेड्या ठोकल्या असून त्याची कारागृहात रवानगी करण्यात आली आहे. शिक्षकाने विद्यार्थिनीवर अत्याचार केल्याची ही तिसरी घटना आहे. 


तक्रार दाखल होताच रावणवाडी पोलिसांनी त्या नराधम शिक्षकावर गुन्हा दाखल करून अटक केली आहे. त्याला भंडारा येथील कारागृहात पाठविण्यात आले आहे. मागील दोन महिन्यातील ही तिसरी घटना आहे. सातत्याने गोंदिया जिल्ह्यामध्ये शिक्षकांनी विद्यार्थिनीवर अत्याचार केल्याचे प्रकार उघडकीस येत आहेत. त्यामुळे गोंदिया जिल्ह्यात नेमकं चाललंय तरी काय? असा प्रश्न प्रामुख्याने उपस्थित होत आहे. तर या घटनेनंतर शिक्षण विभाग कारवाई का करत नाहीत किंवा अशा घटना थांबावण्यासाठी उपाययोजना का करत नाही? असा प्रश्नही उपस्थित होत आहे.


गोंदिया तालुक्यातील ही पीडित अल्पवयीन विद्यार्थिनी येथील एका महाविद्यालयात इयत्ता अकरावीत शिकते. ती शौचास गेली असता शिक्षक देवा फत्तू बोरकर (56, रा. कुडवा) याने तिला जबरदस्तीने पकडले आणि प्रयोगशाळेत नेऊन अत्याचार केला. दरम्यान ही विद्यार्थिनी रेल्वेने मुंबईला पोहोचल्याचे कळताच तिचे पालक रावनवाडी पोलिसांसोबत मुंबईला गेले आणि तिथून आल्यानंतर घडलेला प्रकार पोलिसांना सांगितला.


घाबरलेली मुलगी पोहोचली मुंबईत.... 


नराधम शिक्षकाने नागपूर येथील त्याचा परिचित शैलेश तभाने याला बोलावून विद्यार्थिनीला घेऊन जाण्यास सांगितले. तभाने तिला घेऊन भंडारा येथे गेला आणि एक रात्र लॉजमध्ये ठेवून दुसऱ्या दिवशी तिला घरी जाण्यास सांगितले. घाबरलेली विद्यार्थिनी भंडारा येथूनच रेल्वेने मुंबईला गेली. 17 एप्रिल रोजी सीएसटी स्थानकावर पोहोचल्यानंतर तिला पोलिसांनी मातोश्री रमाबाई आंबेडकर पोलिस ठाण्यात नेले आणि तेथूनच तिच्या पालकांना माहिती दिली.


यावर पोलिसांनी भादंवि कलम 363, 376 (2) (फ) सहकलम 4, 6 अंतर्गत गुन्हा नोंदवला तर सपोनि सुनील अबुरे आणि शिपाई सुबोध बिसेन यांनी तपास सुरू करून शिक्षक देवा बोरकर याला अटक केली. त्याला न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्याला भंडारा कारागृहात पाठवून दिले.


ही बातमी वाचा: