Goa Crime पणजी: गोव्यातील (Goa) कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आल्याचं पाहायला मिळालं. गोव्यात (Goa) एका रशियन नागरिकाने 6 वर्षीय रशियन मुलीवर अत्याचार केल्याची घटना घडली आहे. धक्कादायक बाब म्हणजे, हे कृत्य केल्यानंतर आरोपी देश सोडून पळून गेला. ही घटना 5 फेब्रुवारीच्या मध्यरात्री घडली. इल्या वासुलेव असं संशयित आरोपीचं नाव असून त्याच्यावर पॉक्सो (POCSO) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलाय. तक्रारीनुसार, इल्या वासुलेव याने नॉर्थ गोव्यातील अरामबोल येथे नाईट कँपचे आयोजन केले होते. तिथेच त्याने या 6 वर्षाच्या मुलीवर लैंगिक अत्याचार केला. मात्र या प्रकरणातील संशयित आरोपी मायदेशी पळून गेल्याने गोवा पोलीस आता रशियन अधिकाऱ्यांची मदतीने त्याचा शोध घेत असल्याची माहिती समोर येत आहे.
आरोपी देश सोडून फरार
पीडितेच्या पालकांनी 19 फेब्रुवारी रोजी तक्रार दाखल केली. IPC च्या कलम 376, GC कायद्याचे कलम 8(2) आणि POCSO कायद्याच्या कलम 4 आणि 8 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत. या प्रकरणात आरोपी हा रशियाला पळून गेल्याने त्याला पकडणे हे आता पोलीसांपुढे आव्हान असणार आहे. परिणामी गोवा पोलीस आता रशियन अधिकाऱ्यांची मदत घेऊन त्याचा मागवा काढणार असल्याची देखील माहिती समोर आलीये. मात्र एका सहा वर्षाच्या चिमुरडीवर अशाप्रकारे अत्याचार करण्यात आल्याच्या घटनेने गोवा शहर हादरले आहे.
कायदा, सुव्यवस्थेचा प्रश्न ऐरणीवर
दरम्यान, गोव्यात वाढत्या गुन्हेगारीवरून विरोधकांनीही सरकारला घेरलं आहे. या घटनेनंतर पर्यटकांची पहिली पसंती असलेल्या गोव्यातील पर्यटकांच्या सुरक्षेवरून आम आदमी पक्षाने गोव्याच्या प्रमोद सावंत सरकारला धारेवर धरले आहे. गोवा आम आदमी पार्टीचे प्रमुख अमित पालेकर म्हणाले की, हे केवळ एक प्रकरण समोर आले आहे. परंतु सरकार गोव्याच्या संपूर्ण कायदा आणि सुव्यवस्थेकडे लक्ष देत नाही आणि सरकारला गोव्यातील लोकांच्या सुरक्षेची काळजी नाही. गोव्यातील दिवसेंदिवस गुन्हेगारी का वाढत आहे? मुख्यमंत्री हे काय करत आहेत? राज्यात कायदा आणि सुव्यवस्था आहे की नाही, पोलिसांचा धाक कमी झाला आहे ? असे अनेक प्रश्न विरोधकांकडून उपस्थित केले जातायत.
इतर महत्वाच्या बातम्या