मुंबई : घाटकोपर होर्डिंग दुर्घटना (Ghatkopar Hoarding Accident) प्रकरणात मोठी अपडेट समोर आली आहे. इगो मीडियाची पूर्व संचालक जान्हवी मराठे हिला मुंबई सत्र न्यायालयाने मोठा दणका दिला आहे. इगो मीडियाची पूर्व संचालक जान्हवी मराठेचा अटकपूर्व जामीन अर्ज मुंबई सत्र न्यायालयानं फेटाळला आहे. डिसेंबर 2023 पर्यंत जान्हवी इगो मीडियाची संचालक होती. तिच्याच कार्यकाळात घाटकोपर येथील दुर्घटनाग्रस्त झालेलं होर्डिंग उभारण्यात आलं होतं. दुर्घटना झाली तो होर्डिंग इगो मीडियाच्या मालकीचा होता. एसआयटीनं जान्हवी मराठेलाही याप्रकरणी आरोपी ठरवलं आहे. घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेत 17 जणांचा मृत्यू झाला होता,  तर 74 लोक जखमी झाले होते.


स्ट्रक्चरल इंजिनिअरला 5 जूनपर्यंत पोलिस कोठडी


घाटकोपर होर्डिंग दूर्घटनेप्रकरणी अटक केलेल्या स्ट्रक्चरल इंजिनिअरला 5 जूनपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे. गुन्हे शाखेनं याप्रकरणी मनोज संघु नावाच्या स्ट्रक्चरल इंजिनिअरला अटक करून शुक्रवारी मुख्य महानगर दिंडाधिकारी कोर्टात हजर केलं होतं. यानंतर न्यायालयाने मनोजला 5 दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे. मनोज संघू हा बीएमसीचा मान्यताप्राप्त स्ट्रक्चरल इंजिनिअर असून त्यानंच दुर्घटनाग्रस्त झालेल्या होर्डिंगला स्टेबिलिटी सर्टिफिकेट दिलं होतं. 


भावेश भिंडेला उदयपूरमधून अटक


दरम्यान, घाटकोपर दुर्घटनेच्या चौकशीच्या भीतीने इगो मीडियाचा संचालक म्हणजे होर्डिंग दुर्घटनेतील मुख्य आरोपी भावेश भिंडे स्वतःच्या ड्रायव्हरला घेऊन मुंबईतून बाहेर पळाला. त्यानंतर तो लोणावळ्यात एका खासगी बंगल्यात काही तास थांबला होता. त्यानंतर पोलीस आपल्या मागावर आहेत, याचा अंदाज भावेशला होता. भावेशने ड्रायव्हरला नवीन सिमकार्ड आणण्याच्या बहाण्याने बाहेर पाठवले आणि तासाभराने भिंडे एकटाच लोणावळ्याच्या बंगल्यातून निघून गेला.


भावेश भिंडे सध्या न्यायालयीन कोठडीत


लोणावळ्यातून भावेश भिंडे अहमदाबादला एका नातेवाईकाच्या घरी गेला. तिथे त्याने मुक्काम केला. त्यानंतर भावेश भिंडे राजस्थानमधून जयपूरला पळाला. जयपूरमध्ये एका हॉटेलमध्ये भावेश भिंडे याने त्याच्या भाच्याच्या नावाने रुमही बुक केली आणि तिथेच लपला. मात्र, गुन्हे शाखेची सहा ते सात पथकं राजस्थान, जयपूर, अहमदाबाद आणि लोणावळा परिसरात त्याचा शोध घेत होती. यामुळे मुंबई पोलिस गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्यांनी भावेश भिंडेला याच हॉटेलमधून अटक केली. भावेश भिंडे सध्या न्यायालयीन कोठडीत आहे.


रेल्वेचे सहाय्यक पोलिस आयुक्तांची कसून चौकशी


घाटकोपर होर्डिंग प्रकरणात रेल्वेचे सहाय्यक पोलिस आयुक्त शहाजी निकम यांची सलग दोन दिवस गुन्हे शाखेकडून चौकशी करण्यात आली. पहिल्या तीन होर्डिंगच्या तुलनेत चौथ्या म्हणजेच पडलेल्या होर्डिंगमधून सर्वाधिक रक्कम लोहमार्ग पोलिसांच्या खात्यात जमा झाल्याचं तपासात उघड झालं आहे. पहिल्या तीन होर्डिंगमधून 13 लाखाची रक्कम मिळत होती, तर चौथ्या होर्डिंगमधून म्हणजेच ज्या होर्डिंगची दुर्घटना झाली, त्या होर्डिंगमधून 11 लाखाहून अधिक रक्कम ही लोहमार्ग पोलिसांच्या खात्यात जमा होत असल्याची माहिती चौकशीतून पुढे आली आहे.