कोल्हापूर : मला नोटीस पाठवण्यापेक्षा चुकीच्या गोष्टी बंद करा, मी मंत्र्यांच्या मतदारसंघात मंत्र्यांच्या घरासमोर जाऊन माझं म्हणणं मांडणार आहे. माझ्यावर अब्रू नुकसानुकसानीचा दावा करून पैसे मागितले, तर माझ्याकडे पैसे नाहीत. मी जेलमध्ये जाईन, आम्हाला म्हातारी मेल्याचे दुःख नाही, मात्र काळ सोकावता कामा नये,  अशा शब्दात काँग्रेस आमदार रवींद्र धंगेकर यांनी वैद्यकीय शिक्षण मंत्री तथा कोल्हापूरचे पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी दिलेल्या इशाऱ्यावर पलटवार केला. आमदार रवींद्र धंगेकर आज कोल्हापूर दौऱ्यावर होते. त्यांनी अंबाबाईचे दर्शन घेतले. पत्रकार परिषदेत बोलताना त्यांनी हसन मुश्रीफ यांनी दिलेल्या इशाऱ्यावर प्रतिक्रिया दिली. हसन मुश्रीफ यांनी धंगेकर यांनी माफी न मागितल्यास दावा दाखल करण्याचा इशारा दिला आहे. या पार्श्वभूमीवर धंगेकर भूमिका स्पष्ट केली. 


मी पुणेकर आहे घाबरणारा नाही


धंगेकर यांनी बोलताना सांगितले की ललित पाटील प्रकरणात देखील मी मुश्रीफ यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. मी कुणाची माफी मागणारा कार्यकर्ता नाही. धंगेकर घाबरणारा माणूस नाही. सत्तेसाठी वडिलांसारख्या शरद पवारांना सोडून जाणाऱ्या मुश्रीफांनी मला धमकी देऊ नये, मी पुणेकर आहे घाबरणारा नाही. चार तारखेनंतर मी विधानसभेत नसेल, तर लोकसभेत असेल अशा शब्दांमध्ये रवींद्र धंगेकर यांनी पलटवार केला. ससूनमधील कारभारानंतर आमदार रवींद्र धंगेकर यांनी मुश्रीफांना आरोपांच्या पिंजऱ्यात उभे केले होते. त्यामुळे धंगेकरांनी माफी मागावी, अशी मागणी मुश्रीफ यांनी केली होती. 


उडता पंजाब सारखं उडता पुणे किंवा उडता महाराष्ट्र म्हणायची वेळ आली


धंगेकर पुढे म्हणाले की, छत्रपती शिवरायांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या पुण्यामध्ये काळीमा फासणाऱ्या घटना घडत आहेत. उडता पंजाब सारखं उडता पुणे किंवा उडता महाराष्ट्र म्हणायची वेळ आली आहे. लोकशाही पद्धतीने मी रस्त्यावर आलो आहे. पब संस्कृती थांबली पाहिजे माझी भूमिका असल्याचे धंगेकर म्हणाले. पुण्यामध्ये देशभरातील सर्व शहरातून मुलं शिकण्यासाठी येत असतात. इतर देशातील शहरातील नेणाऱ्या मुलांच्या पालकांचे फोन येत आहेत. पुण्यातील नागरिक गप्प बसणार नाही लक्षात आल्यावर दोन पोलीस निलंबित करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. 


रक्त फेकून देण्यापर्यंत गुन्हा डॉक्टरांनी केला असल्याचेही धंगेकर यांनी सांगितले. पोलिसांनी चांगला तपास केला, पण अजूनही प्रकरण दाबण्याचा प्रयत्न होत असल्याचा दिसत असल्याचा आरोप धंगेकर यांनी केला. पैसे टाकून सिस्टम विकत घेता येऊ शकते, ही त्या श्रीमंतांची भूमिका होती असेही त्यांनी यावेळी सांगितले.  मंत्र्यांवर टीका केल्यानंतर माझा राग आला, पण पुण्यातील पब बंद होत नसतील, तर मी कोणाची माफी मागणार नसल्याचे ते म्हणाले. पुण्यात येणाऱ्या प्रत्येक मुलाला संरक्षणासाठी मी रस्त्यावर उतरणार असल्याचे त्यांनी सांगितले.