Gadchiroli Naxal गडचिरोलीगडचिरोली पोलिसांच्या सी - 60 दलाने मोठी कारवाई करत माओवाद्यांचा घातपाताचा डाव उधळून लावला आहे. नक्षलवाद्यांचा कॅम्प आणि कॅम्प जवळ नक्षलवाद्यांनी लावलेले आयईडी स्फोटक यशस्वीरित्या नष्ट करण्यात पोलिसांना यश आले आहे. दरम्यान, यावेळी झालेल्या चकमकीत सी - 60 (C-60) चे जवान आणि नक्षलवाद्यांमध्ये (Naxal) बराच वेळ गोळीबार ही झाला. मात्र, सी-60 च्या जवानांनी जोरदार प्रत्युत्तर दिलं. त्यामुळे नक्षलवादी आपला कॅम्प सोडून पळून गेले. यावेळी पोलिसांनी (Gadchiroli Police) घटनास्थळाची पाहणी केली असता त्यांना स्फोटकांनी भरलेली आयईडी जमिनीत पुरून ठेवलेलं आढळून आले आहे. ही घटना टिपागड आणि कसनसूर येथे काल दुपारच्या सुमारास घडली आहे. या कारवाईमुळे पोलिसांना मोठे यश आले असून पुढील मोठा घातपाताची घटना टळली आहे.


जमिनीत पुरून ठेवलेले स्फोटके केले नष्ट


गडचिरोली पोलिसांना मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे, टिपागड आणि कसनसूर दलम चे काही नक्षलवादी कुलभट्टी गावाजवळ तेंदू पत्ता कंत्राटदारांना भेटून त्यांच्याकडून खंडणी वसूल करणार असल्याची माहिती प्राप्त झाली. ही माहिती मिळताच सी-60 च्या जवानांनी अतिरिक्त पोलीस अधीक्षक कुमार चिंता यांच्या नेतृत्वात तात्काळ ऑपरेशन राबवलं. दरम्यान, संध्याकाळी उशिरा अंधार पडताच गस्तीवर असलेल्या पोलीस जवानांवर नक्षलवाद्यांनी अचानकच  गोळीबार सुरू केला.


त्यानंतर सी-60 च्या जवानांनीही जोरदार प्रत्युत्तर दिलं. त्यामुळे नक्षलवादी आपला कॅम्प सोडून पळून गेले. त्यानंतर सी -60च्या जवानांनी नक्षलवाद्यांचा कॅम्प नष्ट केला असून त्या ठिकाणाहून मोठ्या प्रमाणावर नक्षलवाद्यांचे साहित्य जप्त केले आहे. सोबतच याच कॅम्पच्या जवळ नक्षलवाद्यांनी पुरून ठेवलेलं आयईडी स्फोटकही जवानांनी यशस्वीरित्या नष्ट केले आहे.


14 जहाल माओवाद्यांचं आत्मसमर्पण


गडचिरोली पोलीस दलाने अतिशय प्रभावीपणे माओवादविरोधी अभियान राबविल्यामुळे तसेच शासनाने माओवाद्यांना आत्मसमर्पणाची सुवर्णसंधी उपलब्ध करून दिल्याने, सन्मानाने जीवन जगण्यासाठी सन 2022 ते 2024 सालामध्ये आतापर्यंत एकूण 14 जहाल माओवाद्यांनी आत्मसमर्पण केले आहे. पोलीस अधीक्षक गडचिरोली नीलोत्पल यांनी आवाहन केलं आहे की, विकासकामांना आडकाठी निर्माण करणाऱ्या माओवाद्यांवर पोलीस दल सक्षमपणे कारवाई करण्यास तत्पर असून, जे माओवादी विकासाच्या प्रवाहात सामील होण्यास इच्छुक असतील त्यांना विकासाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी तसेच लोकशाहीतील सन्मानाचे जीवन जगण्यासाठी गडचिरोली पोलीस दल सर्वतोपरी मदत करेल, तसेच त्यांनी हिंसेचा त्याग करुन शांततेचा मार्ग स्विकारावा, असं आवाहन पोलिसांनी केलं आहे. 


इतर महत्वाच्या बातम्या