Raver Lok Sabha Election Result 2024 : कुठल्याही संघटनेत काम करताना सगळ्यांची सामूहिक जबाबदारी असते. चांगलं काम झाले की त्याचे श्रेय सगळे घेतात आणि अडचण आली तर इतरांवर अपयश लोटलं जातं, अशातच या निवडणुकांमध्ये काही प्रमाणात आलेल्या अपयशाची जबाबदारी माझ्यासह सगळ्यांची आहे. मात्र, असे असतानाही देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी ही सगळी जबाबदारी आपल्या खांद्यावर घेतली असून राजीनामा देण्याची तयारी दाखवली आहे. हा त्यांचा मोठेपणा आहे. मात्र, आजपर्यंत त्यांनी सरकारमध्ये राहूनही अनेक चांगले काम केले असल्याने, त्यांनी या पुढे ही अशाच पद्धतीने काम केले पाहिजे, अशी आमची इच्छा आहे. त्यांसाठी त्यांनी राजीनामा देऊ नये, असे आपल्यालाही वाटत असल्याची प्रतिक्रिया रावेर लोकसभा मतदारसंघाच्या विजयी उमेदवार रक्षा खडसे (Raksha Khadse) यांनी बोलताना व्यक्त केली आहे. राज्यातील भाजपच्या पराभवाची जबाबदारी घेत देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्रीपद सोडण्याचा निर्णय घेतलाय. याविषयी बोलताना रक्षा खडसे यांनी आपले मत व्यक्त केले आहे.
पराभवाची जबाबदारी सर्वांचीच - रक्षा खडसे
या वेळीच्या निवडणुकीमध्ये आमच्या नेत्यांनी आणि कार्यकर्त्यांनी भरपूर मेहनत घेतली आहे. मात्र तरीही स्थानिक प्रश्नांचा आम्हाला फटका बसला आहे, हे खरे आहे. या निवडणुकीमध्ये ज्या ठिकाणी आम्ही कमी पडलो आहोत त्याचा विचार करून, त्यात सुधारणा करून पुढील काळात देवेंद्र फडणीस, चंद्रशेखर बावनकुळे यांच्या नेतृत्वात आम्ही अधिक चांगल्या प्रकारे काम करण्याचा आमचा प्रयत्न राहील, असा विश्वासही खासदार रक्षा खडसे यांनी बोलून दाखवला आहे.
रावेर लोकसभा मतदारसंघ हा भाजपने (BJP) आपला गड राखला असून महायुतीच्या (Mahayuti) उमेदवार रक्षा खडसे (Raksha Khadse) यांनी विजयाची हॅटट्रिक केली आहे. रक्षा खडसे यांनी राष्ट्रवादी शरद पवार गटाचे उमेदवार श्रीराम पाटील (Shriram Patil) यांचा दारूण पराभव केला आहे. रावेर लोकसभेत महायुतीच्या उमेदवार रक्षा खडसे यांनी 2 लाख 62 हजारांच्या मतांनी विजय मिळवला. तर महाविकास आघाडीचे उमेदवार श्रीराम पाटील यांना पराभवला सामोरे जावे लागले आहे. या विजयानंतर त्यांनी ही प्रतिक्रिया दिली आहे.
फडणवीस आज दिल्लीला जाणार
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज दिल्लीला जाण्याची शक्यता आहे. आज पंतप्रधान नरेंद्र मोदी व गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेण्याची शक्यता आहे. राज्यातील पराभवाची जबाबदारी घेत देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्रीपद सोडण्याचा निर्णय घेतलाय. याबाबत ते चर्चा करण्याची शक्यता आहे. केंद्रीय नेतृत्व देवेंद्र फडणवीस यांची विनंती मान्य करणार का? याबाबत राजकीय चर्चा सुरु आहे.
इतर महत्वाच्या बातम्या