सोलापूर: सांगोला येथील डॉक्टर ऋचा सुरज रुपनर यांच्या आत्महत्येप्रकरणी अखेर माझाच्या दणक्यानंतर मुख्यमंत्री शिंदे गटातील नेते व उद्योगपती भाऊसाहेब रुपनर यांना यांना रात्री उशिरा सांगोला पोलिसांनी (Police) कोल्हापूर येथून अटक केली आहे. ABP माझाने ही वस्तुस्थिती दाखवल्यानंतर पोलीस खडबडून जागे झाले आहेत. वरिष्ठांकडून चौकशा सुरू झाल्यावर पोलिसांनी झटपट कारवाईला सुरुवात केली. कोल्हापूर (Kolhapur) येथून सासरे उद्योगपती भाऊसाहेब रुपनर यांना अटक करण्यात आली. तर, आत्महत्येसाठी जबाबदार असणारा पती डॉ. सुरज रुपनर यालाही पोलसांनी बेड्या ठोकल्या आहेत. त्याच्या अटकेसाठी विविध ठिकाणी टीम पाठवण्यात आल्या होत्या. पोलिसांवर कोणताही दबाव नसल्याचा दावा देखील पंढरपूरचे उपविभागीय पोलीस अधिकारी अर्जुन भोसले यांनी एबीपी माझाशी बोलताना केला होता. त्यानंतर, आज डॉक्टरला सूरजला अटक करण्यात आली.
सांगोल्यातील हाय प्रोफाईल महिला डॉक्टर ऋचा हिच्या आत्महत्येस कारणीभूत असलेला पती डॉ. सूरज रुपनरला अखेर सांगोला मिरज रोडवरील नाझरे टोल नाक्यावरुन पोलिसांनी ताब्यात घेतले. थोड्याच वेळात पोलीस आरोपी सूरजला घेऊन पोहोचणार आहेत. गेल्या सहा दिवसांपासून सूरज हा पोलिसांना चकवा देत होता. अखेर काल रात्री उद्योगपती वडील भावुसहेब रुपनर यांना अटक केल्यानंतर आता फरार असलेला सूरज पोलिसांच्या तावडीत सापडला आहे.
उच्चशिक्षित असणाऱ्या डॉ. ऋचा रुपनर हिने व्याभिचारी पतीच्या शारिरिक व मानसिक ताणाला कंटाळून 6 जून रोजी पहाटे सांगोला येथील राहत्या घरी आत्महत्या केली होती. या आत्महत्येनंतर पोलिसांकडून अतिशय संथगतीने तपास केला जात असून राजकीय दबाव व पैशाचा वापर करुन केस दाबण्याचा प्रयत्न सुरु असल्याचा कुटुंबाचा आरोप होता. या घटनेला 6 दिवस उलटूनही डॉ. ऋचा हिच्या फरारी पतीस पोलिसांनी अटक न केल्याने सोशल मीडियावर डॉ. ऋचा हिला न्याय मिळवून देण्यासाठी मोहिम राबविली जात होती. विशेष म्हणजे एबीपी माझानेही हे वृत्त लावून धरले होते.
डॉक्टरांचा पोलीस ठाण्यात ठिय्या
सोलापूर जिल्ह्यातील संतप्त डॉक्टरांनी काल रात्री सांगोला पोलीस ठाण्यात जाऊन या प्रकारचा जाब विचारला. मात्र, पोलिसांकडून समाधानकारक उत्तरे न मिळाल्याने डॉक्टरांनी पोलीस ठाण्यातच जोरदार आंदोलन सुरु केले होते. अखेर काल रात्री या प्रकरणातील पुरवणी फिर्याद घेऊन डॉ. ऋचा हिचे सासरे भाऊसाहेब व सासू सुरेखा रुपनर हिच्यावर गुन्हा दाखल झाला. त्यानंतर आरोपींना तातडीने अटक करा म्हणून सर्व डॉक्टर पोलीस ठाण्यात थांबून राहिल्यावर अखेर कोल्हापूर येथून सासरे भाऊसाहेब रुपनर यांना ताब्यात घेऊन त्यांना अटक करण्यात आली. भाऊसाहेब रुपनर हे फॅबटेक उद्योग समूहाचे सर्वेसर्वा असून त्यांचे प्रस्थ बरेच मोठे आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे ते नेते असून सांगोल्याचे आमदार शहाजीबापू पाटील यांचे ते निकटवर्तीय म्हणून ओळखले जातात. दरम्यान, अजूनही पोलिसांच्या तपासाबाबत जनतेत शंका असून मृत डॉ ऋचा हिचा मोबाईल ताब्यात घेणे असेल किंवा इतर गोष्टी पोलिसांकडून होत नसल्याचे पीडित कुटुंबीयांचे सांगणे आहे.
6 जून रोजी गुन्हा दाखल होऊनही अटक नाही
डॉक्टर ऋचा रुपनर हिने गुरुवारी 6 जून रोजी आत्महत्या केली होती त्यांचे शवविच्छेदन सांगोला येथे नातेवाईकांनी करू दिले नाही, तर सोलापूर येथील शासकीय रुग्णालयात करण्यात आले होते. त्यानंतर ऋचावर माहेरी पंढरपूर येथेच अंत्यसंस्कार करण्यात आले होते. ऋचा हिला पती सुरज रुपनर हा पैशाची मागणी करायचा, तसेच व्याभिचारी असल्यानेच ऋचाला आत्महत्येस प्रवृत्त केले. डॉक्टर सुरजवर गुन्हा दाखल होऊन सहा दिवस होऊनही निष्क्रिय सांगोला पोलिसांनी आरोपीला अटक केली नव्हती. त्यामुळे, सोशल मीडियातून संताप व्यक्त केला जात होता, तर, इंडियन मेडिकल असोसिएशन पंढरपूर शाखेचे शंभरहून अधिक महिला व पुरुष डॉक्टरांनी पंढरपूरहून सांगोला येथे आरोपी डॉक्टर सुरज रुपनर याच्या अटकेसाठी आंदोलन केले.
पोलीस स्टेशनमध्येच ठिय्या आंदोलन करत पोलिसांच्या निष्क्रियतेबाबत घोषणा देऊन पोलीस स्टेशन दणाणून सोडण्यात आले. पोलिसांवरील वाढता दबाव लक्षात घेऊन अखेर रात्री साडेदहा वाजण्याच्या सुमारास आरोपी भाऊसाहेब रुपनर यांना कोल्हापूरहून सांगोला पोलिसांनी मागील दारातून आणून अटक केली. त्यानंतर, आता आरोपी डॉक्टर पतीलाही बेड्या ठोकण्यात आल्या आहेत.