अॅमेझॉन आणि फ्लिपकार्टला गंडा घालणाऱ्या टोळीचा पर्दाफाश, अभियंत्यासह चार जणांना ठोकल्या बेड्या
Dombivli Manpada Police : डोंबिवली पलावा या हायप्रोफाइल सोसायटीमध्ये राहणाऱ्या रॉबिन आरूजा या अभियंत्याने झटपट पैसे कमविण्याच्या नादात फसवणूक करण्याचा मार्ग अवलंबला.

मुंबई : डोंबिवलीत एका अभियंत्याने आपल्या चार साथीदारांच्या मदतीने अॅमेझॉन आणि फ्लिपकार्ट या कंपन्यांना गंडा घातल्याचे उघड झाले आहे. रॉबिन आरुजा असं या अभियंत्याचं नाव असून त्याच्यासह किरण बनसोडे, रॉकी कर्न, नवीन सिंग, आलोक यादव, या साथीदारांना मानपाडा पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ही टोळी बनावट आधार कार्डाच्या सहाय्याने सीम कार्ड मिळवायची, त्या सीमकार्डच्या सहाय्याने अॅमेझॉन आणि फ्लिपकार्ट या कंपन्यांमधून महागड्या वस्तू मागवायचे. मागविलेल्या वस्तू घेऊन येणाऱ्या पार्सल बॉयला बतावणी करुन त्याने आणलेल्या पार्सलमधून वस्तू काढून घेत त्यात त्याच वजनाची दुसरी वस्तू टाकून परत करायचे. काही मिनटात ते काम करत होते. या पाच जणांच्या टोळीने देशभरातील अनेक राज्यात या दोन कंपन्यांना गंडा घातला आहे. अखेर या टोळीला डोंबिवलीतील मानपाडा पोलिसांनी अटक केली आहे.
डोंबिवली पलावा या हायप्रोफाइल सोसायटीमध्ये राहणारा रॉबिन आरूजा हा अभियंता आहे. झटपट पैसे कमविण्याच्या नादात त्याने फसवणूक करण्याचा मार्ग अवलंबला. यासाठी त्याने आणखी चार जणांची निवड केली होती. त्याच्या टोळीत सिम कार्ड विक्रेता देखील होता. ही पाच जणांची टोळी अॅमेझॉन आणि फ्लिपकार्ट कंपनीला गंडा घालण्याचे काम करत होते.
या टोळीकडून बबनावट आधारकार्ड तयार करून आधी सिम कार्ड मिळवले जात असे. या सिम कार्डच्या आधारे ॲमेझॉन आणि फ्लिपकार्ट या कंपनीकडून मोबाईल व इतर महागड्या वस्तू ऑर्डर केली जात असे, त्या वस्तू घेऊन डिलिव्हरी बॉय आल्यानंतर त्याच्याकडून काही ना काही बहाणा करून तो बॉक्स घ्यायचे, त्याची नजर चुकवून अवघ्या काही क्षणात बॉक्स कटरच्या साह्याने कापून त्यातील वस्तू काढून त्याऐवजी त्याच वजनाच्या दुसऱ्या वस्तू ठेवायचे, पैसे कमी असल्याचा बहाणा करत तो बॉक्स पुन्हा कंपनीला पाठवून द्यायचे. त्यानंतर या वस्तू त्या बाजारात कमी किमतीत विक्री करायचे, अशी माहिती पोलीस तपासातून पुढे आली आहे.
याबाबत मानपाडा पोलीस ठाण्यात तक्रार करण्यात आली होती. त्यानंतर वरिष्ठ पोलीस निरीक्षक शेखर बागडे यांच्या मार्गदर्शनाखाली मानपाडा पोलीस ठाण्याच्या पथकाने मोठ्या शिताफिने या प्रकरणाचा तपास करत या टोळीला जेरबंद केलंय. त्यांच्याकडून 22 मोबाईल, एक लॅपटॉप, एक आयपॅड, एक टॅब, वीस सिम कार्ड, 29 बनावट आधारकार्ड असा पावणे सहा लाखांचा मुद्देमाल जप्त केला आहे. या पाच जणांनी गुजरात, कलकत्ता राज्यातील विविध शहरात तसेच महाराष्ट्रातील पुणे, मुंबई, सातारा, ठाणे, अलिबाग या शहरात अशा प्रकारचे गुन्हे केल्याचे कबुली दिली आहे. यापूर्वी देखील त्यांना कराड, अलिबाग, कासारवडवली या पोलीस ठाण्यात अशा प्रकारचे गुन्हे केल्याबद्दल अटक केल्याची माहिती समोर आली आहे.
Before You Go
Allegations Against Mangesh Jagtap Baramati: रिसॉर्ट बूक केलं, तारीख काढली, मला बघताच पळतो...; मंगेश जगताप यांच्यावर गंभीर आरोप, राष्ट्रवादीतील तरुणी थेट जिल्हा परिषदेच्या सभेत पेट्रोल घेऊन घुसली, पुण्यात खळबळ!






















