Dombivli Crime News : दीड कोटीच्या खंडणीसाठी डोंबिवलीत एका 12 वर्षाच्या मुलाचे अपहरण झाले होते. पण पोलिसांनी एखाद्या चित्रपटाच्या कथानकाप्रमाणे 75 तासांत गुन्हेगारांना बेड्या ठोकल्या. डोंबिलीच्या मानपाडा पोलीस ठाण्यात या 12 वर्षाच्या मुलाचे अपहरण झाल्याची तक्रार येताच पोलिसांनी शोध सुरू केला. आरोपी या मुलाला घेवून ठाणे, भिवंडी, नाशिक, पालघर आणि गुजरात अशी ठिकाणे बदलत असल्याने तब्बल 20 पथकांनी या मुलाचा शोध सुरू केला. डोंबिवलीपासून सुरू झालेला पाठलाग सुरतला संपला व पोलिसांनी बारा वर्षाच्या रुद्रची सुखरूप सुटका केली. याप्रकरणी पाच आरोपींना पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. पाच आरोपींमध्ये तीन महिलांचा समावेश आहे.
9 नोव्हेंबर रोजी डोंबिवली पूर्वेतील एमआयडीसी परिसरात राहणारे व्यवसायिक रणजीत झा यांचा 12 वर्षीय मुलगा रुद्र क्लासमधून घरी परतला नाही. झा यांनी मुलांची काही वेळ वाट बघितली, मात्र मुलगा न आल्याने याबाबत मानपाडा पोलीस ठाण्यात तक्रार दिली. त्यांच्या मुलाचे अपहरण करण्यात आले होते. मानपाडा पोलिसांनी रुद्र झा या मुलाच्या शोध घेण्यास सुरुवात केली तर दुसरीकडे रणजीत झा यांच्या मोबाईलवर एक फोन आला, संबंधित व्यक्तीने तुमचा मुलगा आमच्या ताब्यात असून मुलाची सुखरूप सुटका करायची असेल तर एक कोटी रुपये द्या अशी धमकी दिली. दुसऱ्या दिवशी फोन करणाऱ्या व्यक्तीने दीड कोटीची मागणी केली. पोलीस उपायुक्त सचिन गुंजाळ यांच्या मार्गदर्शनाखाली मानपाडा पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शेखर बागडे यांचा नेतृत्वात पोलिसांची 20 पथकं नेमण्यात आली. ज्या क्लास मधून रुद्रचे अपहरण झाले होते, त्या क्लासचा आजूबाजूच्या परिसतील पोलिसांनी सीसीटीव्ही तपासले. या cctv मध्ये अपहरण करणाऱ्या आरोपींनी जी गाडी वापरली होती, त्या गाडीच्या नंबर दिसला. आरोपी देखील स्पष्ट दिसले. यानंतर पोलिसांच्या तपास सुरू झाला. गाडीचा नंबर बनावट होता. तर आरोपींकडे असलेला मोबाईल चोरीचा असल्याचे निष्पन्न झाले. सीसीटीव्ही आणि मोबाईल लोकेशनच्या आधारावर पोलीस पथक आरोपींच्या शोधात होते. आधी माहिती मिळाली की आरोपी पालघर येथील एका ठिकाणी आहेत. पोलिसांचं पथक त्या ठिकाणी पोहोचले. आरोपींच्या शोधासाठी स्थानिक पोलिसांसह पालघर जिल्ह्यातील जवळपास 400 स्थानिक लोकांची पोलिसांनी मदत घेतली. तरी पण आरोपी पोलिसांच्या तावडीतून निसटले.
यादरम्यान पोलीस आणि आरोपी समोरासमोर आले असता आरोपींनी पोलिसांच्या गाडीला ठोकर देत पसार झाले. सुदैवाने या अपघातात पोलिसांनी आपला बचाव केला. नंतर पोलिसांना माहिती मिळाली आरोपी दुसऱ्या ठिकाणी पोहोचले आहे. पोलिसांची 20 पथकं ठाणे शहर, ठाणे ग्रामीण, नाशिक शहर, नाशिक ग्रामीण, पालघर, बलसाड, आणि सुरत जिल्ह्यात दाखल झाले. पोलिसांना माहिती मिळाली की, आरोपी सुरतला पोहोचले आहेत. मिळालेल्या माहितीनुसार पोलिसांचे पथक सुरतमधील आरोपी लपलेल्या ठिकाणी पोहोचले. छापा टाकत रुद्रची सुटका केली आणि अपहरण करणाऱ्या दोन सराईत गुन्हेगारांसह तीन महिला असे एकूण पाच आरोपींना अटक केली. फरहशहा फिरोजशहा रफाई, प्रिन्स कुमार सिंग, शाहीन मेहतर, फरहिंद सिंग, नाझिया रफाई अशी या आरोपींची नावे आहेत. आरोपी हे सर्व नातेवाईक आहेत. हे सर्व आरोपी गुजरातमधील असून मुख्य आरोपी फरहदशा रफाई याच्यावर दुहेरी हत्या , चोरी , दारू तस्करी आदी गंभीर गुन्हे दाखल आहेत. फरहदशा याने नियोजित कट रचला होता. त्यानुसार त्याने रेकी करत रुद्रला हेरले. त्याचे अपहरण कधी व कसे करायचे? कुठे न्यायचे? कोणत्या मार्गाने जायचे? हा सगळा प्लॅन त्याने आधीच आखला होता. खंडणीसाठी फोन करण्यासाठी चोरी केलेला मोबाईल वापरला.. इतकेच नव्हे तर डोंबिवलीवरून निघाल्यानंतर त्याने गाडीची पुन्हा नंबर प्लेट बदलली व ही गाडी सीसीटीव्ही मध्ये येऊ नये म्हणून वाटेत येणारे सगळे टोल चुकवून तो आड मार्गाने प्रवास करत होता.
आज अतिरिक्त पोलीस आयुक्त दत्तात्रय शिंदे, डोंबिवली सहायक आयुक्त सुनील कुऱ्हाडे, डीसीपी सचिन गुंजाळ यांनी पत्रकार परिषद घेऊन या सर्व प्रकरणाची माहिती दिली .पोलीस आयुक्त जगजीत सिंग यांच्याकडून वीस पथकातील सर्व पोलिसांचे सन्मान व सत्कार केला जाणार असल्याची माहिती देखील देण्यात आली आहे. या मुलासोबत काही गैरप्रकार होऊ नये यासाठी पोलिसांनी सर्वपरीने प्रयत्न केले. अखेर पोलिसांच्या या प्रयत्नाला यश आलं . रुद्रची सुखरूप सुटका झाली आणि त्यांच्या कुटुंबीयांनी सुटकेच्या श्वास घेतला.