Dhule Crime : मुलींची छेड काढल्याचा जाब विचारणाऱ्या बाप लेकावर जमावाने हल्ला करुन त्यांना बेदम मारहाण केल्याची घटना धुळे (Dhule) जिल्ह्यातील साक्री तालुक्यातील निजामपूर गावात घडली आहे. या मारहाणीत गंभीर जखमी झालेल्या एकाचा मृत्यू झाला असून दुसरा युवक नंदुरबारच्या रुग्णालयात अत्यवस्थ अवस्थेत उपचार घेत आहे. 


दरम्यान आरोपींना अटक केल्याशिवाय मृतदेह नेणार नसल्याची भूमिका संबंधितांनी घेतल्या. त्यामुळे पोलीस पथकाने पहाटेपर्यंत पाच आरोपींना बेड्या ठोकल्या आहेत. दरम्यान गावात शांततेचे वातावरण असून नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेऊ नये, असे आवाहन पोलीस अधीक्षक प्रवीणकुमार पाटील यांनी केले आहे.


नेमकं काय घडलं?
निजामपूर येथे राहणाऱ्या दोन मुली किराणा दुकानाकडे जात असताना गावातील सागर आणि मगन या दोघा मुलांनी त्यांचे हात पकडून त्यांची छेड काढण्याचा प्रयत्न केला. यावेळी असरार मुनाफ मणियार यांनी या दोघा मुलांना छेड काढू नका, असे सांगून हटकले. तसेच यावेळी सागर आणि मगन यांनी असरार याला बेदम मारहाण करण्यास सुरुवात केली. सागर याच्या हातात असलेल्या फळीला खिळे ठोकलेले असल्याने असरार मणियार याला गंभीर स्वरुपाच्या जखमा झाल्या.


दरम्यान असरार याचे वडील मुनाफ गफ्फार मणियार हे देखील भांडण सोडवण्यासाठी गेले असता त्यांना घटनास्थळावर असणाऱ्या अनिल, सतीश, शुभम, गोल्या आणि राकेश यांनी मारहाण करण्यास मदत केली. सागर खैरनार याने हातातील फळीने मुनाफ यांना डोक्याच्या मागील बाजूस गंभीर स्वरुपाची मारहाण केली. त्यामुळे मुनाफ जमिनीवर कोसळले तसेच असरार देखील गंभीर जखमी होऊन जमिनीवर पडला होता. त्याच्या नाकातून रक्त निघत असल्याने त्याला शाहरुख शेख, अखिल शेख याने मोटरसायकलीवर बसवून जैताणे येथील ग्रामीण रुग्णालयात नेत असताना, असरार याने निजामपूर पोलीस ठाण्यात तक्रार द्यायची असल्याचे सांगून पोलीस ठाण्याकडे नेण्यास सांगितले. 


त्यावरुन पोलीस ठाण्यात नेले असता पोलिसांनी उपचारासाठी मेमो दिला. या दरम्यान उपचारासाठी त्याला आणले असता त्याला वैद्यकीय अधिकाऱ्यांनी नंदुरबार येथे रुग्णवाहिकेने येण्यास सांगितले. यावेळी शाहरुख शेख यांना भ्रमणध्वनीवरुन मोमीन खान हुसेन खान यांनी संपर्क करुन मुनाफ गफार मणियार हे गंभीर जखमी झाले असल्याचे सांगितले. तसेच त्यांच्या डोक्याला झालेल्या गंभीर दुखापतीमुळे त्यांचा मृत्यू झाल्याची माहिती दिली.


Dhule News : निजामपूर- जैताणे गावात दोन गटात हाणामारी, दोघांचा मृत्यू; पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात


नातेवाईकांचा संताप, मृतदेह घेण्यास नकार
या घटनेमुळे निजामपूर शहरात एकच खळबळ उडाली.  मुनाफ मणियार यांच्या नातेवाईकांनी त्यांचा मृतदेह निजामपूर पोलीस ठाण्याच्या आवारात आणून ठेवला. आरोपींना अटक केल्याशिवाय पुढील कार्यवाही करणार नसल्याची भूमिका घेतल्यामुळे तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. दरम्यान ही माहिती कळल्याने अप्पर पोलीस अधीक्षक प्रशांत बच्छाव, उपविभागीय पोलीस अधिकारी प्रदीप मैराळे, स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे निरीक्षक हेमंत पाटील हे अतिरिक्त पोलीस पथकांसह निजामपूर गावात पोहोचले. त्यांनी नातेवाईकांची समजूत घालण्याचा प्रयत्न सुरु केला. 


या दरम्यान पोलीस पथकाने तातडीने हालचाली करत पाच आरोपींना ताब्यात घेतले आहे. आरोपींचे अटक सत्र सुरु झाल्यामुळे नातेवाईकांचा रोष कमी झाला. यादरम्यान रात्री सात जणांच्या विरोधात वेगवेगळ्या कलमांन्वये निजामपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.