Petrol Diesel Demand : जुलै महिन्याच्या पहिल्या पंधरवड्यात देशात पेट्रोल आणि डिझेलच्या मागणीत घट झाली आहे. रविवारी जाहीर झालेल्या आकडेवारीतून ही बाब समोर आली आहे. देशभरात मान्सून सुरू झाला आहे. त्याच्या परिणाम इंधन विक्रीत घट झाली आहे. मान्सून दाखल झाल्यानंतर देशातील काही भागांमध्ये इंधनाचा वापर कमी होतो. त्याशिवाय वाहतूकही कमी झाल्याने मागणी घटली आहे. डिझेलची विक्री एक ते 15 जुलै दरम्यान 13.7 टक्क्यांनी घटून 31.6 लाख टन इतकी झाली. मागील महिन्यात याच कालावधीत डिझेलची विक्री 36.7 लाख टन इतकी झाली होती.
देशात डिझेल विक्री मान्सूनवर मोठ्या प्रमाणावर आधारीत आहे. साधारणपणे एप्रिल-जून या महिन्याच्या कालावधीच्या तुलनेत जुलै-सप्टेंबर या तिमाहीत डिझेलची मागणी कमी असते. पुरामुळे वाहतूक कमी प्रमाणावर होते. तर, मान्सूनमुळे कृषी क्षेत्रात डिझेलचा वापर कमी होतो. सिंचन करण्यासाठी पंप चालवण्यासाठी डिझेलचा वापर होतो. मान्सूनच्या काळात पंपाचा वापर कमी होतो.
दरम्यान, वार्षिक तुलनेत डिझेलची मागणी 27 टक्क्यांनी वाढली आहे. मागील वर्षी याच कालावधीत कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे डिझेलची मागणी घटली होती. एक जुलै ते 15 जुलै 2020 च्या तुलनेत डिझेलची मागणी 43.6 टक्क्यांनी वाढली आहे. त्यावेळी 22 लाख टन डिझेलची विक्री करण्यात आली होती. तर, कोविडपूर्व काळात जुलै 2019 च्या तुलनेत ही विक्री 13.7 टक्के अधिक होती.
जुलै महिन्याच्या पहिल्या पंधरवड्यात पेट्रोलची विक्री 7.8 टक्क्यांनी घटून 12.7 लाख टन इतका झाली. मागील महिन्याच्या या कालावधीत ही मागणी 13.8 लाख टन इतकी होती. जुलै 2021 च्या तुलनेत ही विक्री 23.3 टक्के आणि जुलै 2020 च्या पंधरवड्यात 46 टक्क्यांनी अधिक आहे. जुलै 2019 या कोविड पूर्व काळाच्या तुलनेत या कालावधीत पेट्रोलची मागणी 27.9 टक्के आहे.
विमान सेवा पुन्हा सुरू झाल्यानंतर देशांतर्गत आणि परदेशी प्रवासाची संख्या वाढली आहे. त्यामुळे विमान इंधनाच्या मागणीत वाढ झाली आहे. या पंधरवड्यात 2,47,800 टन इतक्या विमान इंधनाची मागणी नोंदवण्यात आली.