Crime News जळगाव : दिल्ली पोलिसांच्या विशेष पथकाकडून (Special Squad of Delhi Police) जळगाव जिल्ह्यातील भुसावळ (Bhusawal) शहरामधून एकाला ताब्यात घेण्यात आल्याने खळबळ उडाली आहे. ही व्यक्ती सिमी (SIMI) या दहशतवादी संघटनेशी संबंधित असल्याचे सांगितले जात असून एका शाळेत तो शिक्षक म्हणून काम करत होता. मिल्लतनगरमधील राहत्या घरातून त्याला अटक करण्यात आली आहे. हानिफ शेख असे संशयित आरोपीचे नाव आहे. 
 
दिल्लीतील न्यू फ्रंट कॉलनी पोलीस स्थानकात 2001 साली युएपीए कायदा तसेच 153 अ, 153 ब आणि 120 ब कलमान्वये त्याच्यावर गुन्हा दाखल आहे. गुन्हा दाखल असल्यापासून हानिफ शेख हा फरार होता. 2001 मधील गुन्हा प्रतिबंधित दहशतवादी संघटना ‘सिमी’ शी संबंधित असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. पोलिसांनी गोपनीय माहिती तसेच तांत्रिक विश्लेषणावरून हानिफ शेख याचा पत्ता शोधून काढला होता.


भुसावळमधून हानिफला अटक 


गुरुवारी दुपारी बाजारपेठ पोलिसांच्या (Bazarpeth Police Station Bhusawal) मदतीने दिल्लीतून आलेल्या पथकाने हानिफला भुसावळ येथील खडका रोड दत्तनगर मेहराज बिल्डिंगमधून अटक केली. दिल्ली स्पेशल सेलचे निरीक्षक पवन कुमार, एस आय सुमित, नवदीप व अन्य अधिकारी या पथकात सहभागी होते. संशयित आरोपीस दिल्ली पोलिसांच्या विशेष पथकाने ताब्यात घेतल्यानंतर त्याची वैद्यकीय तपासणी केली आणि भुसावळ न्यायालयात (Bhusawal Court) हजर केले. न्यायालयाकडून ट्रांझिस्ट रिमांड घेतल्यानंतर दिल्ली पोलिसांचे विशेष पथक तात्काळ दिल्लीच्या दिशेने रवाना झाले. 


23 वर्षांपूर्वी हानिफ विरुद्ध दिल्लीत गुन्हा दाखल


23 वर्षांपूर्वी स्टूडेंट्स इस्लामिक मूवमेंट ऑफ इंडिया (Students Islamic Movement of India) या दहशतवादी संघटनेच्या इस्लामिक मुव्हमेंट या मासिकामध्ये प्रक्षोभक लिखाण केल्याबद्दल आरोपी हानीफ विरुद्ध दिल्लीत गुन्हा दाखल करण्यात आला होता. याप्रकरणी आरोपी शेख सातत्याने गैरहजर राहिल्याने दिल्ली न्यायालयाने (Delhi Court) 2002 मध्ये त्याला फरार घोषित केले होते. त्यानंतर संशयित आरोपी हा भुसावळ येथे असल्याची माहिती दिल्ली स्पेशल सेलला मिळाली. आरोपीला अटक (Arrest) करण्यासाठी दिल्ली स्पेशल सेलचे 15 अधिकारी आणि कर्मचारी भुसावळमध्ये दाखल झाले. या घटनेमुळे जिल्ह्यात मोठी खळबळ उडाली आहे.


इतर महत्वाच्या बातम्या


Manoj Jarange Patil: राहुल गांधींनी तुला मराठा समाजावर टीका करायला सांगितलेय का? जरांगेंनी काँग्रेस नेत्याला फटकारलं


नवं चिन्ह,नवी सुरुवात, रायगडावर तुतारीचा नाद घुमणार,शरद पवार गट लोकसभेचं रणशिंग फुंकणार!